बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) गावाला जाणाऱ्या बसला सायंकाळी शाळा-महाविद्यालय सुटण्याच्या वेळेला गर्दी होत आहे. यामुळे कुद्रेमानी गावातील विद्यार्थ्यांना सायंकाळी ५ च्या ऐवजी रात्री ७.३० बसने घरी जावे लागत आहे.
यामुळे कुद्रेमानीला शाळेच्या वेळेत सकाळी २ व सायंकाळी २ बसेस अधिक सोडाव्यात, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी युनियन जिमखान्याजवळ मंगळवारी (ता. २३) सायंकाळची बस थांबवून सुमारे तासभर आंदोलन केले.
बेळगाव शहरापासून २० किलोमीटर अंतरावर कुद्रेमानी गाव आहे. या ठिकाणचे विद्यार्थी बेळगावला शाळा व महाविद्यालयाला येतात. यामुळे या बसला नेहमी गर्दी असते. या भागातील बऱ्याचश्या विद्यार्थ्यांची शाळा ४.३० वाजता सुटते. तसेच त्यांना युनियन जिमखाना येथील बस थांब्यावर ४.३० पर्यंत बससाठी हजर रहावे लागते. यासाठी काही विद्यार्थी शिक्षकांना सांगून रोज ४ किंवा ४.१५ वाजता शाळेतून यावे लागते . यामुळे बसमुळे त्यांच्या शिक्षणावर देखील परिणाम होत आहे.
यासंबंधी कुद्रेमानी ग्रामस्थांनी अनेक वेळा परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तरिही याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. यामुळे गुरुवारी (ता. २४) पुन्हा परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले जाणार आहे. सीबीटीपासून कुद्रेमानीची बस आल्यानंतर चन्नमा सर्कलला पुर्ण क्षमतेने भरते. यामुळे युनियन जिमखान्याजवळ कुद्रेमानी गावातील असलेल्या विद्यार्थ्यांना इतर बसचा आसरा घ्यावा लागतो. यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यास खुप उशीर लागतो. रोज होणाऱ्या या प्रकाराला विद्यार्थ्यांनी कंटाळून बस समोर आंदोलन केले. आंदोनस्थळी विद्यार्थ्यांनी बसच्या समोर जावून आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप घेतल्यानंतर बस मार्गस्थ झाली. तरीही कुद्रेमानी गावातील अनेक विद्यार्थ्यांना त्या बसमधून जाता आले नाही. ते सायंकाळी उशीरापर्यंत बस थांब्यावर थांबून होते.
