नागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे डॉ. रवींद्र भोयर यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दिलेल्या मालमत्तेबाबतच्या शपथपत्रात त्यांनी तीन कोटी ५९ लाखांची मालमत्ता असल्याची माहिती दिली.
भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्नीच्या मालमत्तेसह ३३ कोटींची मालमत्ता आहे.
डॉ. रवींद्र भोयर यांनी उमदेवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रातील तपशीलानुसार त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता तीन कोटी २५ लाख तर अचल संपत्ती ३४ लाख १५ हजार ९०५ रुपयांची आहे. यामध्ये मुदतठेव ४ लाख ९३ हजारांची आहे. सोने-चांदीच्या वस्तू दहा लाखांच्या आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावे स्थावर मालमत्ता नाही. परंतु, अचल संपत्ती १० लाख ८ हजार ९५० रुपयांची आहे.
त्यांच्या पत्नीकडे ९४ हजार ५०० बाजारमूल्य असलेले सोने-चांदीचे दागिणे आहेत. त्यांच्याकडे तीन हजार चौरस फूटाची बिगरशेती जमीन असून किंमत २ कोटी २५ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे शेती नाही. त्यांच्याविरोधात सक्करदरा पोलीस ठाण्यात दोन आणि गिट्टीखदान पोलिस ठाण्यात एक असे तीन गुन्हे दाखल आहेत. तिन्ही फौजदारी गुन्हे आहेत. परंतु, एकही प्रकरणात दोषारोष ठेवण्यात आलेले नाही, अशी माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०१४ मध्ये कामठी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. २०१४ साली बावनकुळे, त्यांच्या पत्नी, मुलगा व मुलगी मिळून एकूण ७ कोटी ४९ लाख ९६ हजारांची एकूण संपत्ती होती. त्यात ६५ लाख २७ हजारांची चल संपत्ती व ६ कोटी ९४ लाखांच्या अचल संपत्तीचा समावेश होता. २०१४ ते २०१९ या कालावधीत बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
सोमवारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार बावनकुळे व त्यांच्या पत्नी ज्योती यांच्या नावे मिळून एकूण ९० लाखांहून अधिकची अचल संपत्ती आहे, तर ३३ कोटी ८३ लाख ७७ हजार ११७ रुपयांची चल संपत्ती आहे. बावनकुळे यांच्याविरोधात विविध प्रकारचे दहा गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत. यातील केवळ एका प्रकरणात न्यायालयीन खटला सुरू असून, आठ प्रकरणात न्यायालयात आरोपपत्रदेखील दाखल करण्यात आलेले नाही.
