Crime 24 Tass

Chandrapur : दारू दुकानाच्या परवानगीवरून ग्रामसभेत राडा

चंद्रपूर : चंद्रपूर शहराजवळ असणाऱ्या दुर्गापूर (Durgapur) येथे दारू दुकानाच्या (Liquor store) परवानगीवरून ग्रामसभेत मोठा राडा झाला आहे.
मागील ग्रामसभेत दारू दुकानाला परवानगी नाकारल्यानंतरही ग्रामपंचायतीने (GramPanchayat) हा ठराव आजच्या विषयसूचित पुन्हा ठेवला. मात्र ग्रामस्थांनी या निर्णायाला तीव्र विरोध केल्यावर ग्रामपंचायतीला हा निर्णय मागे घ्यावे लागला.
दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या मागील ग्रामसभेत वादग्रस्त दारू दुकानाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही आजच्या विषयसूचित ग्रामपंचायतीने हा ठराव अगदी दुसऱ्या क्रमांकावर ठेवला. दुर्गापूरमधील वार्ड क्र. 4 मध्ये देशी दारू दुकान आणि मोबाइल टॉवर (Mobile tower) नको, या मागणीसाठी ग्रामसभेत ग्रामस्थांनी अनोखी एकजूट दाखविली. ग्रामस्थांनी या विषयासंदर्भात संतप्त भूमिका घेतली. नागरिक आणि सभेमध्ये ठराव मांडणाऱ्यांमध्ये हमरीतुमरी झाल्यावरती या ग्रामसभेत पोलिसांना (Police) पाचारण करण्यात आले. जवळपास पाच तास चाललेल्या ग्रामसभेत अखेर ग्रामस्थांचा विजय झाला. वीज-रस्ते- पाणी- स्वच्छता या ऐवजी दारू दुकान आणि मोबाइल टॉवरला अनुकूलता असणाऱ्या ग्रामपंचायतीचा पराभव झाला.
एकीकडे दुर्गापूर परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे, तर दुसरीकडे यावर मार्ग काढत विकासकामे अजेंड्यावर ठेवण्याऐवजी ग्रामपंचायतीने भलताच प्राधान्यक्रम ठरविला. आजच्या सभेत मात्र दारू दुकान आणि मोबाइल टॉवर नको, यावर शिक्कामोर्तब झाले. जिल्ह्यात केवळ दुर्गापूरच नव्हे तर ब्रह्मपुरी- सावली -व्याहाड -गडचांदूर व ऊर्जानगर येथेही अशाच पद्धतीने दारू दुकानांना स्थानिकांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. यातून आता ग्रामपंचायती कसा मार्ग काढणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]