Crime 24 Tass

विदर्भातील धान खरेदीबाबत मंत्री भुजबळांनी घेतली बैठक; बारदाना खरेदीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

नाशिकः धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येवू नयेत, धान ठरलेल्या वेळेतच खरेदी केले जावे, याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. शेतकऱ्यांकडून धान खरेदीबाबत आलेल्या सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
मंत्रालयातील दालनात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयातील धान खरेदीबाबत बैठक पार पडली. या बैठकीत भुजबळ बोलत होते. या बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, दूरदृश्यप्रणालीव्दारे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंघला,जिल्हाधिकारी गोंदिया नयना गुंडे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, बाजार समितीचे लोमेश वैद्य, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोलीचे जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.
बारदाना खरेदीसाठी प्रस्ताव
बैठकीत भुजबळ म्हणाले की, धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येवू नयेत. तसेच धान विहित वेळेतच खरेदी केले जावे, याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयातून धान खरेदीबाबत काही सूचना आहेत. त्याबाबत सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बारदान खरेदीसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्यात यावे. धान खरेदी करताना तपासण्यात येणारे निकषामुळे जर काही अडचण निर्माण होत असल्यास वरिष्ठ कार्यालयांकडून क्षेत्रीय कार्यालयांनी तात्काळ मार्गदर्शन घ्यावे. मात्र, धान खरेदी ही वेळेतच केली जावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
गोदामांची आवश्यकता
खासदार पटेल म्हणाले की, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात धान खरेदी वेळेत केली जावी. धान साठवणुकीसाठी गोदामांची आवश्यकता आहे. राज्य शासनामार्फत आवश्यक त्या ठिकाणी गोदाम बांधण्यात यावेत. धान विक्रीच्या पोत्याची हातशिलाई करावे लागते. त्याबाबतीतही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. त्या लक्षात घेतल्या जाव्यात. ज्या ठिकाणी धानाची थप्पी लावली जाते, ती थप्पी देखील सर्वांना मोजता येईल अशा पध्दतीची असावी. बाजार समित्यांनी खरेदी केलेल्या बारदानाचा निधी विहित वेळेत दिला जावा, धान खरेदीबाबत गुणवत्ता तसेच संनियत्रण योग्य पध्दतीने करताना समित्या तसेच शेतकरी यांना अडचण होवू नये याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, अशा सूचना पटेल यांनी केल्या.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]