Crime 24 Tass

८ वर्षाच्या युगांतला दिसत नव्हती आई, अन् मग तोही बसला आंदोलनाला…

भंडारा : गेल्या २४ दिवसांपासून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज तोडगा निघेल असे वाटत होते, पण तोही अद्याप निघाला नाही. महिला, पुरुष कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयसुद्धा आंदोलनात सहभागी झाले आहे. पण भंडाऱ्यात मात्र आई घरी दिसत नसल्याने ८ वर्षांचा चिमुरडासुद्धा आंदोलनात सहभागी झाला आहे.
युगांत बांते, असे या चिमुकल्याचे नाव आहे. मला घरी आई दिसत नसल्यामुळे करमत नव्हते. विचारले तेव्हा ती आंदोलनात गेली आहे, असे घरचे सांगायचे. त्यामुळे मी येथे येऊन आंदोलनात आईला मदत करीत आहे, असे युगांतने सांगितले. दिवसभर आम्ही आंदोलनस्थळी असतो. त्यामुळे मुलाकडे दुर्लक्ष होते. माझी वाट बघून बघून मुलगा थकून जातो. मलाही माझ्या बाळाशिवाय राहणे होत नाही, पण आमचे अधिकार मिळेपर्यंत मागे हटायचे नाही, असे ठरवले आहे. त्यामुळे ममता बाजूला सारून मी पूर्णवेळ आंदोलनात सहभागी झाले आहे, असे युगांतची आई चेतना प्रवीण बांते यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण राज्य सरकारमध्ये झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचेही चेतना बांते म्हणाल्या. चेतना बांते या भंडारा एसटी वर्कशॉपमध्ये मेकॅनिक आहेत. मुलगा घरी राहात नसल्याने त्याचे खाणेपिणे त्यांना आंदोलनस्थळीच करावे लागते. त्यामुळे त्याच्या प्रकृतीची चिंता त्यांना भेडसावत आहे. ८ वर्षांचा चिमुकला आंदोलनात दिसत असल्यामुळे जिल्हाभरात तो चर्चेचा विषय झाला आहे. गेल्या २४ दिवसांपासून आपल्या न्याय हक्कांसाठी झगडत असलेल्या महिला, पुरुष कर्मचाऱ्यांवर आता तरी सरकारने दया करावी, असा प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत. सरकारच्या हेकेखोरपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकही वेठीस धरले जात आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेते केवळ चर्चेच्या फेऱ्यांवर फेऱ्या झाडत आहेत. पण तोडगा मात्र निघाला नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत, असेही राज्यकर्ते खासगीत बोलतात. तर मग मागण्या पूर्ण करून कर्मचाऱ्यांना दिलासा का देत नाहीत? त्यांना मरण्यासाठी असे वाऱ्यावर का सोडले, असे प्रश्‍न आंदोलकांना पडले आहेत. सरकार म्हणतंय की, आंदोलकांनी एक पाऊल मागे घ्यावे, पण महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण हीच त्यांची मुख्य मागणी आहे. याच मुद्यासाठी सरकार अन् आंदोलक दोघेही अडून बसले आहेत. त्यामुळे तोडगा निघत नाहीये. आता एक पाऊल कोण मागे घेणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]