भंडारा : नागरिकांच्या पार्सलची आदान प्रदान करणाऱ्या फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन कार्यालय चोरट्यांनी फोडले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली असून सोमवारला सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन कार्यालयातील तिजोरी पळवून नेली. फ्लिपकार्ट कार्यालयातील तिजोरीतील ६.४४ लाखांच्या रकमेवर चोरांनी डल्ला मारला. या घटनेने भंडारा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात ॲमेझॉनचे कार्यालय आहे. तर, नागपूर नाका मार्गावरील तकिया वार्डात फ्लिपकार्टचे कार्यालय आहे. आज सकाळी काही नागरिकांना या दोन्ही कार्यालयाचे शटर फोडून त्यात चोरी झाल्याची बाब लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच भंडाराचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कार्यालयात चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने शटर तोडल्याची गंभीर बाब लक्षात आली.
चोरट्यांनी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या दोन्ही कार्यालयातील रोख ठेवण्यात येत असलेल्या तिजोरी चोरून नेल्या. सदर दोन्ही तिजोरी चोरट्यांनी दोन्ही कार्यालयाच्या जवळपासच फोडल्या. ॲमेझॉन कार्यालयातील तिजोरीत रक्कम नसल्याने ती तिजोरी तिथेच फेकून देण्यात आली. तर फ्लिपकार्ट कार्यालयातील तिजोरीत असलेली रोख सहा लाख ४४ हजार ४७३ रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. फ्लिपकार्ट कार्यालयातील तिजोरी तिथे जवळच फोडून फेकल्याची बाब पोलिसांना तपासणी दरम्यान लक्षात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी स्वान पथकाला घटनास्थळावर पाचारण केले. दरम्यान, या गंभीर प्रकरणी पोलिसांनी परिसरातील मार्गावर तथा ठीकठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली आहे. यात लवकरच चोरटे गजाआड होतील, असा विश्वास भंडारा पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
