अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा आणि अमेरिकन पॉप गायक निक जोनास घटस्फोट घेत असल्याची अफवा वा-याच्या वेगाने पसरली. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीमागचे खरे सत्य प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी सांगितले आहे.
हायलाइट्स:
• प्रियांकाने सोशल मीडियावरून जोनास आडनाव काढले
• प्रियांका आणि निक यांच्या घटस्फोटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
• आई मधु चोप्रा यांनी मांडली लेकीची बाजू
• खासगीकरणाच्या दिशेनं एसटीचं पाऊल; महामंडळानं घेतला ‘हा’ निर्णय
मुंबई : बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून तिच्या नवऱ्याचे निक जोनस याचे आडनाव काढून टाकले आहे. प्रियांकाच्या या कृतीमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आणि सोशल मीडियावर याबाबतची जोरदार चर्चा सुरू झाली. ही चर्चा या दोघांच्या घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचली. दरम्यान, प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी आपल्या मुलीने केलेल्या या कृती मागचे खरे कारण सांगितले आहे.
काय म्हणाल्या मधु चोप्रा
प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून जोनस हे आडनाव काढून टाकले. यावरून दोघांचा घटस्फोट होत असल्याची चर्चा होऊ लागल्यानंतर मधु चोप्रा यांनी ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे सांगितले. मधु चोप्रा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे.’ तसेच अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवू नका असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, प्रियांका आणि निक यांनी १ डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केले. लवकरच या दोघांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रियांका आणि निकने एकत्र दिवाळी साजरी केली होती. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. प्रियांकाने जरी तिच्या सोशल मीडिया हँडलवरून जोनस हे आडनाव काढून टाकले असले तरी हे दोघेजण इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत आहेत.
प्रियांकाच्या कामाबद्दल सांगायचे तर ‘द व्हाईट टायगर’ या सिनेमात तिने काम केले होते. त्यानंतर प्रियांकाने हॉलिवूडमधील ‘सिटाडेल’, ‘टेक्स फॉर यू’ आणि ‘मॅट्रिक्स ४’ या सिनेमांत दिसणार आहे. तर बॉलिवूडमधील ‘जी ले जरा ‘ या सिनेमात आलिया भट्ट आणि कतरीना कैफ यांच्यासोबत प्रियांका काम करणार आहे.
