केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आपल्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी नुकत्याच ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर पोहोचल्या होत्या. मात्र गेटवरील सुरक्षा रक्षकाने त्यांना ओळखलेच नाही आणि त्यांना सेटवर जाण्यापासून रोखले.
त्यामुळे संतापलेल्या स्मृती इराणी शूटिंग न करताच माघारी परतल्या आहेत.
स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांचा ड्रायव्हर आणि दोन लोकांच्या टीमसह सायंकाळी कपिल शर्मा शोच्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचल्या. गेटवरील सुरक्षा रक्षकाने त्यांना ओळखलेच नाही. त्याने इराणी यांना आत जाऊ दिले नाही. स्मृती इराणी यांनी त्याची खूप समजूत काढली आणि सांगितले की, आम्हाला एपिसोड शूट करण्यासाठी खास आमंत्रण आहे, मी केंद्रीय मंत्रीदेखील आहे, मात्र सुरक्षा रक्षक काही केल्या ऐकेना. तेवढय़ात तिथे आलेल्या एका फूड डिलिव्हरी बॉयला मात्र काहीही न विचारता सुरक्षा रक्षकाने आत सोडले. त्यामुळे इराणी यांच्या रागाचा पारा आणखी चढला. अखेर शूटिंग न करताच त्या दिल्लीला परतल्या.
कपिलची माफी
दरम्यान, आपण ज्यांना आत जाण्यापासून रोखले त्या केंद्रीय मंत्री आहेत असे समजताच त्या सुरक्षा रक्षकाने तेथून पळ काढला आणि मोबाईलदेखील बंद केला. कपिलच्या टीमला हा प्रकार समजल्यावर सेटवर एकच गोंधळ उडाला. शोच्या टीमने स्मृती इराणी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर कपिलनेदेखील इराणी यांची माफी मागितली आहे. मात्र, आता त्या पुन्हा या शोमध्ये सहभागी होणार की नाही अद्याप अस्पष्ट आहे.
