Crime 24 Tass

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की…; नवाब मलिकांचा नारायण राणेंना टोला

मुंबई – मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलाथापालथ झाल्याचं दिसून आलं. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली.
भाजपा-शिवसेना यांनी युती करत विधानसभा निवडणूक लढवली. परंतु मुख्यमंत्रिपदावरुन या दोन्ही पक्षाचं बिनसलं आणि शिवसेनेने भाजपासोबत फारकत घेतली. भाजपानं राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही त्यांना विरोधी बाकांवर बसायला लागलं.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीनं स्थापन केलेली महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. परंतु भाजपा नेते गेल्या २ वर्षात अनेकदा हे सरकार पडणार असल्याची डेडलाईन देतात. सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत तसेच भाजपा नेतेही सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी कधीही थांबवत नाही. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याची आणखी एक डेडलाईन दिली आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी त्यांना टोला लगावला आहे. मलिक म्हणाले की, काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय असं मलिकांनी म्हटलं.
काय म्हणाले नारायण राणे?
लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपा(BJP) सरकार सत्तेत येईल. तुम्हाला जो अपेक्षित बदल आहे तोदेखील दिसून येईल. मार्च महिन्यापर्यंत बदल दिसून येतील,” असं केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी विधान केले आहे. “जे काही आहे ते सर्व आता सांगता येणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार स्थापन करायचं असेल तर गोष्टी या गुप्त ठेवाव्याच लागतात,” असंही राणेंनी यावेळी नमूद केलं.
राज्यातील प्रमुख नेते दिल्लीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) शुक्रवारी सर्व कार्यक्रम रद्द करत दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून पवार दिल्लीला गेल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीतच आहेत. त्यामुळे, पवारांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात मोठा बदल दिसून येईल, असा मोठा दावा केल्यानं नेमकं राज्याच्या राजकीय वर्तुळात काय सुरु आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]