Crime 24 Tass

अधीक्षक अभियंत्याच्या दालनात आमदाराचे ठिय्या आंदोलन

गोंदिया : विद्युत विभागाकडून ऐन वेळी शेतीचा वीजपुरवठा खंडित केल्याबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.
याचीच दखल घेत त्यांनी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीला घेऊन रामनगर येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात शेतकऱ्यांसह गुरुवारी (दि.२५) ठिय्या आंदोलन केले. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
महावितरणने शेतकऱ्यांना चुकीचे वीजबिल पाठविले आहेत. शेतीसाठी विद्युत विभाग आठ तास वीजपुरवठा करतो आणि मोटार ही ३ एच. पी.च्या वर नसल्याने अंदाजे महिना सरासरी ८०० रुपयांच्या वर वीजबिल जाऊ शकत नाही. म्हणजे प्रति क्वार्टर दोन ते अडीच हजार रुपयांच्यावर शेतकरी बांधवांना बिल यायला नको. तरी सुद्धा सरासरी वीज बिल हे ६ ते ८ हजार रुपये पाठविले जात आहे. एकूण वीजबिल हे लाखांच्या घरात असून, शेतकऱ्यांनी जर बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित केला जातो. अव्वाच्या सव्वा बिले पाठविणे ही शेतकरी बांधवांची थट्टाच आहे. म्हणून जोपर्यंत शेतकऱ्यांचे वीजबिल दुरुस्त करून देणार नाही तसेच खंडित केलेली वीजजोडणी पूर्ववत करणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका आमदार विनोद अग्रवाल व शेतकऱ्यांनी घेतली होती. यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, अधीक्षक अभियंता यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांना वाढीव बिले आली आहेत त्यांनी एक अर्जासह आपले बिल जोडून कार्यालयाकडे करावा. विद्युत विभागाने दिलेली वाढीव वीजबिले कमी करून देऊ. तसेच चार क्वार्टरचा नियम आहे. पण किमान २ क्वार्टरचे पैसे भरल्यास वीज जोडणी पूर्ववत करू, असे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना दिले.त्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. पण आश्वासनाची पूर्तत: न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]