भंडारा : आपसी वादातून उपसरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारला रात्री ९.४५ वाजताच्या दरम्यान भंडारा तालुक्यातील दवडीपार येथे घडली.
दिनेश बांते (३७) रा. दवडीपार (बेला) असे मृतकाचे नाव आहे. मृतक दिनेश दवडीपार ग्रामपंचायतचे उपसरपंच असून ते शिवसेनेचे विभागप्रमुख म्हणूनही समर्थपणे जबाबदारी सांभाळत होते. गावातीलच माजी पोलीस पाटील मते त्यांच्या कुटुंबियांशी त्यांचा आपसी
वाद होता. जुन्या वादातून शेजारी राहणाऱ्या मते कुटुंबीयांनी त्यांचाशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर मते कुटुंबियांनी दिनेशला लाकडी काठ्यांनी जबर मारहाण केली.
या मारहाणीत दिनेशच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. गावातील नागरिकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याला
मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल गायधने, युवा सेना जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, काँग्रेसचे युवा नेते बालू ठवकर हे तातडीने दवडीपारला पोहोचले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिनेशला त्यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने गावात तणावपूर्ण दहशतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तर, जिल्हा सामान्य रुग्णालयात अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती हे स्वतः दाखल झाले.
दरम्यान, या प्रकरणी काहींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मृतक दिनेशच्या मागे पत्नी आणि एक नऊ आणि एक बारा वर्षाचा असे दोन मुले आहेत.
