भंडारा : तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने त्या आधी वरठी रेल्वे स्थानकाजवळील मार्गावर असलेल्या रोडवर ब्रिजचे काम करण्याच्या दृष्टीने या पुलावरून दोन महिन्यांपासून वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान या कामाच्या ठिकाणी आज खासदार सुनील मेंढे यांनी भेट देत 3 डिसेंबर पासून पायी आणि दुचाकी वाहनांसाठी हा पूल सुरू करण्याचे निर्देश दिले.
भंडारा तुमसर मार्गावर असलेल्या या पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. रेल्वे मार्गाचे काम सुरू होणार असल्याने पुलाचे रुंदीकरण करण्याच्या हेतूने दोन महिन्यांपूर्वी काम सुरू झाले. परिणामी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन नागरिक मनस्ताप सहन करीत होते. एक महिन्यासाठी बंद केलेला पूल दोन महिने सुरू न झाल्याने त्रासात चांगलीच भर पडली होती. दरम्यान या पुलावर आज खासदार सुनील मेंढे यांनी भेट दिली.
यावेळी रेल्वेचे अधिकारी आणि पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. हे काम योग्य पद्धतीने व्हावे, कामाच्या दर्जा सोबत कुठेही तडजोड केली जाऊ नये आणि इतर अन्य सूचना यावेळी खासदारांनी केल्या. स्लॅब चे काम पूर्ण झाले असल्याने लवकरात लवकर पायी आणि दुचाकी वाहनांना प्रवासाची परवानगी द्यावी असे निर्देशही खासदारांनी दिले. त्यावर अधिकाऱ्यांनी 3 डिसेंबर पासून दुचाकी वाहनांसाठी हा पूल सुरू केला जाईल असे सांगितले. पूल सुरू करण्यापूर्वी रस्त्याची पातळी व्यवस्थित करणे, पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे लावणे, रस्त्यावर असलेले खाचखळगे बुजविणे ही कामे प्राधान्याने पूर्ण केली जावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. दुचाकी वाहनांसाठी पूल सुरू झाल्यानंतर आठ दिवसात चार चाकी वाहनांना परवानगी देण्याचे निर्देश खासदारांनी दिले.
यावेळी रेल्वे समितीचे सेवकजी कारेमोरे, रेल्वेचे ए.ई.एन कमलाकर सतदेव, पाल, मिलिंदजी रामटेके, घनश्यामजी बोन्द्रे, गणेशजी हिंगे, मनोजजी सुखानी, रवीजी लांजेवार, नितीनजी भाजीपाले, पुष्पाताई भुरे, चांगदेवजी रघूते, संदीपजी बोन्द्रे, बाबूलालजी बोन्द्रे, श्रीरंगजी बोन्द्रे, चेतनदासजी माहुले, अजयजी नानवटकर, आदी उपस्थित होते.
