चंद्रपूर 27 नोव्हेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रात आज, शनिवारी एका वाघिणीचा मृतदेह शनिवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा उपक्षेत्रांतर्गत कारवा- १ नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५०० मध्ये वाघिणीचा मृतदेह दिसून आला. तिचे वय ६ वर्षांचे असून सुमारे चार दिवसांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. वाघिणीचे शवविच्छेदन राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांचे प्रतिनिधी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विलास ताजने व डॉ. कुंदन पोडचेलवार यांनी केले. मृत वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असून मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्याकरता व्हीसेरा नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. मध्यवर्ती रोपवाटिका कारवा येथे शवविच्छेदनानंतर वाघिणीचे दहन करण्यात आले.
