मुंबई, : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. केंद्रीय पातळीवर भाजप (BJP) विरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Agahdi) नेत्यांना भेटण्यासाठी आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी काल शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली.
त्यानंतर ममता बॅनर्जी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दाखल झाल्या. या ठिकाणी त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते देखील उपस्थित होते. या भेटीत तासभर चर्चेनंतर शरद पवार आणि ममता यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भूमिका मांडली.
भेटीमागचं नेमकं कारण काय?
“गेले दोन दिवस मुंबई शहरामध्ये ममता बॅनर्जी यांनी वेगवेगळ्या सेक्शनशी संपर्क साधला. त्यांचं इथे येण्यामागचं कारण हे साहजिकच पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे. जे भाजपच्या विरोधात आहे त्यांनी एकत्र यायला हवं. भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी एकत्र यायची गरज आहे, असे आमचे सर्वसाधारण विचार आहेत. त्याच विषयावर आमच्यात चर्चा झाली”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
‘काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही’
ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसला वगळून देशात मोदी सरकारला पर्याय उभा केला जातोय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं. “सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं आहे. जो मेहनत करेल त्यांच्यासोबत पुढे जाऊ. देशात भाजपला पर्याय उभं करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येतोय. जे कुणी बरोबर येतील, ज्यांची मेहनतीची तयारी असेल ते सगळे बरोबर असतील. काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही. भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यााचे आमचे प्रयत्न सुरु आहेत”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया
यावेळी ममता बॅनर्जी यांनी देखील भूमिका मांडली. “आम्ही भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी एकत्र येतोय. मी त्याबाबत चर्चा करण्यासाठीच इथे आली आहे. शरद पवार यांच्यासोबत माझी चर्चा झाली. मला या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या प्रकृतीमुळे भेटता आलेलं नाही. पण ते लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना मी परमेश्वराचरणी करते. त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना मला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पाठवले. त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे”, असं ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. “देशात सध्या जे सुरु आहे त्याविरोधात एक पर्याय उभा राहिला पाहिजे. भाजपला पर्याय देण्यासाठी स्ट्राँग अल्टरनेटीव्ह सरकार लोकांसमोर उभं करता यायला हवं. त्यासाठी तितकेच सक्षम माणसांची आणि मेहनतीची तयारी असणाऱ्या माणसांची गरज आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करतेय. त्यामुळे मी शरद पवार यांच्यासोबत चर्चा करायला आली आहे. शरद पवार यांनी जे काही सांगितलंय त्याला मी सहमत आहे”, असं ममता यांनी सांगितलं.
‘त्या’ प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर
यावेळी भाजपला पर्याय उभी करणारी तिसरी आघाडी नेमकी कोणाच्या नेतृत्वात उभी राहणार? शरद पवार या आघाडीचं नेतृत्व करणार का? असे सवाल पत्रकारांनी ममता बॅनर्जी यांनी विचारले. त्यावर शरद पवार यांनी भूमिका मांडली. “आम्ही कोणाच्या नेतृत्वात काम करणार ही दुसरी गोष्ट आहे. पण आधी एकत्र येणं आवश्यक आहे. पर्याय उभा करायचा आहे ज्याच्यावर देशाचा विश्वास असेल. इथे लीडरचा विषयच नाही”, असं शरद पवार म्हणाले.
‘आता युपीए काय आहे?’
“शरद पवार काय म्हणाले देशासमोर पर्याय उभा केला पाहिजे. त्यासाठी लढाई करणारी माणसं पाहिजेत. जर कुणी लढत नसेल तर आम्ही काय करणार? तुम्हाला एकत्र येऊन लढावं लागणार आहे. आता युपीए नाहीय. युपीए काय आहे?”, असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. त्यानंतर शरद पवारांनी मुद्दा सावरला. इथे लिडरशीपचा मुद्दाच नाही. लोकांसमोर एक पर्याय उभा करायचा आहे. त्याच मार्गाने आम्ही मार्गक्रमण करणार आहोत, असं पवार म्हणाले.
