गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून प्राथमिक शाळा बंद होत्या.
या शाळांची घंटा १ डिसेंबर रोजी वाजल्याने पहिल्याचदिवशी गोंदिया जिल्ह्यातील १२८५ शाळांपैकी १२४० शाळा सुरू झाल्या आहेत; तर ४५ शाळा पहिल्यादिवशी बंदच होत्या. पहिल्यादिवशी गोंदिया जिल्ह्यातील ४९ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. २५ हजार ३१७ विद्यार्थी गैरहजर होते.
गोंदिया जिल्ह्यात बुधवारपासून (दि. १) शाळा सुरू करण्यात आल्या. ग्रामीण भागातील वर्ग १ ते ४ च्या ११०४ शाळांपैकी १०८७ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरी भागातील वर्ग १ ते ७ वी च्या १८१ शाळांपैकी १५३ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उपिस्थती अधिक राहिली आहे.
गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातील ५४ हजार ६५० विद्यार्थ्यांपैकी ३९ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली; तर शहरी भागातील २० हजार ४१९ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ५० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. ग्रामीण भागातील १७ शाळा बंद, तर शहरी भागातील २८ शाळा बंद अशा एकूण ४५ शाळा बंदच राहिल्या आहेत.
३११ शिक्षक अनुपस्थित
– १ डिसेंबर रोजी प्राथमिक शाळा सुरू झाल्याने पहिल्याचदिवशी जिल्ह्यातील ३११ शिक्षकांनी शाळेला दांडी मारली. गोंदिया जिल्ह्यात ४ हजार ४२३ शिक्षक असून, यापैकी ४ हजार ११२ शिक्षक उपस्थित होते; तर ३११ शिक्षक अनुपस्थित होते. पहिल्यादिवशी दीड वर्षानंतर गुरू आणि शिष्यांच्या भेटी झाल्यात.
४८ हजार पालकांनी दिले संमतीपत्र
– आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे संमती देणारे पत्र पालकांकडून मागविण्यात आले आहेत. ७५ हजार ६९ विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ६०२ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे संमतीपत्र शाळांना दिले आहे. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ हजार ७६९, आमगाव ४ हजार ३७४, देवरी ६ हजार २८४, गोंदिया ९ हजार ८८२, गोरेगाव ५ हजार ७९, सालेकसा ४ हजार ७६८, सडक-अर्जुनी ३ हजार ८०९, तिरोडा ७ हजार ६३७ पालकांनी संमतीपत्र दिले आहे.
