गोंदिया,
रेल्वे स्थानकावर नजर चुकवून प्रवाशांचे मोबाईल चोरणार्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. गौरव उर्फ गुंगा उर्फ सलमान नरेश शर्मा (20, रा.
वरठी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. लोहमार्ग पोलिस अधीक्षक तसेच अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूरचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार व त्यांचे पथक लोहमार्ग गुन्हेगारीस प्रतिबंध गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे. 21 नोव्हेंबर रोजी आश्विन यशवंत टेंभुर्णे (21, रा. कराडगाव) यांचा गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवरून काळ्या रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल अनोळखी व्यक्तीने चोरला होता.
त्याची तक्रार रेल्वे पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून सलमान नरेश शर्मा याला नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले.
अंगझड़तीत त्याच्याकडे विवो मोबाईल व्यतिरिक्त एक 17 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, 12 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 43 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रेल्वे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलिस शिपाई अमोल हिंगने विजय मसराम, चंद्रशेखर मदनकर, मंगेश तितरमारे यांनी केली.
