पांजरा शेतशिवारातील घटना : हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याचा संशय
मोहाडी : बुधवारला दुपारपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळून आला. ही घटना मोहाडी तालुक्यातील पांजरा शेतशिवारातील नाल्यात आज गुरूवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रोशन रामुजी खोडके (२८) रा. कांद्री ता. मोहाडी असे मृतकाचे नाव आहे. आई-वडील नसलेल्या मृतक रोशन हा अविवाहित आहे. मोलमजुरी करून तो आपली उपजीविका भागवीत होता. मृतक रोशन हा काल दुपारपासून घरून बेपत्ता होता. ग्रामस्थ आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोधाशोध घेतला. मात्र, तो कुठेही आढळून आला नाही.
घटनास्थळाजवळ असलेल्या एका शेतात धानाची मळणी सुरू आहे. मशीनच्या माध्यमातून धानाची मांडणी करणाऱ्या एका मजुराला दुपारच्या सुमारास शौचास आली. सदर मजूर शौचास नाल्यावर गेला असता तिथे पाण्यात इसमाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती त्याने सहकारी व शेतमालकाला दिली. घटनेची माहिती आंधळगाव पोलिसांना देण्यात आली.
ठाणेदार सुरेश मट्टानी यांच्या मार्गदर्शनात आंधळगावचे पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पाण्याबाहेर काढला. यावेळी मृतदेहाचा बराचसा भाग नाल्यातील खेकडे आणि मासोळ्यानी खाल्ल्याचे दिसून आले. यामुळे चेहरा विद्रूप झाला होता.
दरम्यान, मृतकाच्या डोक्यावर जखम आढळून आले असून त्याला मारून नाल्यात फेकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृतकाचा आठ दिवसापूर्वी शेजाऱ्यांशी वाद झाला होता, यातूनच ही हत्या करण्यात आली तर नसावी, असा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
