शेतपिकांचे नुकसान : सखल भागात पाणी साचले
भंडारा : सकाळपासून ढगाळ वातावरण होते. यात दुपारच्या सुमारास अचानकपणे वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथे वीज कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तुमसर शहराच्या अनेक सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली आहे.
हवामान खात्याने २८ आणि २९ डिसेंबरला वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविली होती.
आज मंगळवारी दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि गारपीटसह पाऊस सुरू झाला. तुमसर आणि मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने याचा फटका नागरिकांना बसला आहे. तुमसर शहरासह ग्रामीण भागातील पवणारा, नाकाडोंगरी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तर, मोहाडी तालुक्यातील जाम, क्रांद्री, सालई, उसर्रा या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.
या गारपीटीची ढिगारे गावात बघायला मिळाले. अचानक आलेल्या गारपीटसह पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान झाले आहे. फळबागा सोबतच पालेभाज्यांच्या शेतीलाही फटका बसला आहे. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, दुपारी ३ वाजतापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांना याचा मनस्ताप सहन करावा लागल आहे. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भंडारा शहरात अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
मुलाचा मृत्यू; वडील जखमी
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथून जवळच असलेल्या नवेगाव येथील नव वर्षीय नयन परमेश्वर पुंडे हा आपल्या वडिलासह शेतावर गेला होता. यावेळी दुपारी ४ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाने सुरुवात झाली. शेतात वीज कोसळल्याने नयनचा आणि जवळच असलेल्या बैलाचा यात मृत्यू झाला. तर, वडील परमेश्वर हे किरकोळ जखमी झाले. नयन हा आंधळगाव येथील आनंद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता.
