शेती पिकांचे मोठे नुकसान : बळीराजा झाला हवालदिल
भंडारा : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मंगळवारला आणि आज बुधवारला जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने शेत पिके धोक्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
भंडारा जिल्ह्यातील भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी आणि तुमसर या सातही तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने रब्बी पीक आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धान उत्पादक जिल्हा असल्याने सध्या धान मळणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान कापणी होऊन मळणीच्या प्रतीक्षेत धानाची गंजी शेतात ठेवलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी मळणी केल्यानंतर धान पोत्यात बांधून ते विक्रीच्या प्रतीक्षेत घरी जागा नसल्याने शेतावरच तर काहींनी घराच्या अंगणात उघड्यावर ठेवली.
तर अनेकांनी त्यांचे धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी ठेवली. अशा परिस्थितीत मंगळवारला अचानकपणे वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्ट झाली. बोरा एवढ्या आकाराच्या गारपिटीने येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे तूर, गहू, चना, वटाणा, मका, सोयाबीन, करडई, धना, लाखोळी, उडीद, मुंग या पिकांसह पालेभाज्या ज्यात टमाटर, वांगे, कारले, वाल, चवडी शेंगा, मिरची, फुलकोबी, पत्ताकोबी, ढेमस, कांदा, पालक, चवळी भाजी, मेथी भाजी या पालेभाज्या धार्जीनी पिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
जिल्हा प्रशासनाने अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालेले आहे.
