मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दोन महिने उलटूनही कोंडी फुटलेली नाही. यात कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या विशेषत चालक, वाहक कमी असल्याने एसटीही पूर्ण क्षमतेने धावू शकलेल्या नाहीत.
त्यामुळे महामंडळाने खासगी चालकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला असून तशी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
त्यासाठी खासगी संस्थांकडूनही तीन दिवसांच्या आत अर्ज मागविण्यात आले आहेत. याबरोबरच सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्त चालकांना कामावर घेण्यासाठी अर्ज मागितल्याची माहिती एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत, चालकांचा पुरवठा करण्यासाठी खासगी संस्थांनाही अटी व शर्ती घातल्या आहेत. भरती केले जाणारे मनुष्यबळ हे करार पद्धतीने असेल.
अवजड वाहन चालवण्याचा परवाना घेऊन किमान एक वर्षे पूर्ण असणे, अवजड वाहन अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणे आवश्यक असल्याची अट नमूद केली आहे. याबरोबरच एसटीतून सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त झालेल्या चालकांनाही एसटी महामडंळाकडे अर्ज करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यासाठीही तीन दिवसांची मुदत दिली आहे.
वय ६२ वर्षे पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक पाहिजे, अशीही अट यासाठी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्याकडून अत्यंत गंभीर, प्राणांतिक अपघात झालेला नसावा तसेच कर्मचारी बडतर्फ किंवा सेवामुक्त झालेला नसावा, चालकाकडे अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे. या सेवानिवृत्त चालकांना एसटीत करारपद्धतीने आल्यास २० हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
तीन हजार कर्मचारी बडतर्फ ३ हजार ७९ कर्मचाऱ्यांना नोटीस आतापर्यंत एसटीच्या ३ हजार ७९ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येत असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एकूण १ हजार ३३३ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. तर एकूण ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
