भंडारा : ९ जानेवारी २०२१ ची सकाळ संपूर्ण राज्याला हादरवणारी ठरली.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील नवजात शिशु केअर युनिटमध्ये ८ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री लागलेल्या आगीत गुदमरून १० नवजात शिशुचा मृत्यू झाला.
यात तीन बालकांचा होरपळून तर,७ बालकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
ही काळोख रात्र भंडाराच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्र कदापी विसरणार नाही.
लागलेल्या या आगीत हादरलेले चेहरे आणि मातापित्यांच्या किंचाळ्यानी मन हेलावून टाकणारे होते.
या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.

बाल शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीची दाहकता कुणाच्याही कल्पना पलिकडची ठरली.
मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीने प्रशासनासह कर्तव्यावरील अधिकारी,कर्मचार्यांच्या दूर्लक्षितपणामुळे माता-पित्यांना आपली निरागस बालके गमवावी लागली.
नुकत्याच जन्मलेल्या आणि त्यातील अनेकांनी तर,आपल्या माता पित्यांची तोंड ओळखही झाली नाही,अशांनी हे जग बघायच्या आत या कोवळ्या कळ्यांना आगीने आपल्या कवेत घेतले.
ही विदारकता मानवी जीवनाचा थरकाप उडवणारी ठरली.
बेबी केअर युनिटमधून अचानकपणे धूर निघत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे कर्तव्यावरील परिचारिकेने धावत जात दार उघडले असताना तिला तिथे धुराचे लोट असल्याने समोरचे काही दिसत नव्हते.

त्यामुळे भांबावलेल्या परिचारिकेने धावाधाव करीत वरिष्ठांना माहिती दिली.
एव्हाना जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची माहिती भंडारा शहरात वार्यासारखी पसरली.
या माहितीवरून जिल्हाधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा पोलीस अधीक्षक,अग्निशमन दल,पोलीस प्रशासन यासह नागरिकांनी तातडीने रुग्णालय गाठले.
यात दोषी पकडून तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद खंडाते,वैद्यकीय अधिकारी
अर्चना मेश्राम,बालरोग विशेषज्ञ डॉ सुशील अंबादे,ज्योती बारस्कर यांना निलंबित करण्यात आले.
तर,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनिता बडे यांची बदली करण्यात आली.
तर,अधिपरिचारिका नीता आंबीलढुके आणि सुभांगी साठवणे यांना सेवामुक्त करण्यात आले.
जीवन देणारे इनक्यूबेटर ठरले कारणीभुत
ज्या इनक्यूबेटरमध्ये बालकांना नवजीवन मिळणार होते,त्याच इनक्यूबेटरमध्ये झालेल्या स्फोटाने बालकांच्या जीवनाची राखरांगोळी झाली.
ज्यावेळी समोरील दृश्य बघितले,त्यावेळी तिथे असलेल्या बालकांसह संपूर्णा साहित्याची तेवढी राख बघायला मिळाली.
सुदैवाने यातील काही बालकांना वाचविण्यात सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना यश आले.
मात्र,जे बालके जग सोडून गेले किंवा त्यांच्यामुळे माता-पित्यांना मनातील पोकळी कदापिही भरून निघणारी नाही.
नेमका दोषी कोण ?
जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन असो वा राज्य सरकार हे या सर्व गोष्टीला जबाबदार असल्याचे खापर त्या मातापित्यांनी फोडले आहे.
माता-पित्यांच्या आयुष्यातील त्यांच्या गमावलेल्या बालकांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही,हे शल्य त्या मातापित्यांच्या मनात बोचत आहे.
या दुर्घटनेनंतर भंडारा जिल्ह्यात अगदी चार दिवसात मुख्यमंत्र्यांपासून राज्यातील अवघे मंत्रिमंडळ धुराळा उडवित आले.
दुर्घटनेत बालक गमावलेल्या माता-पित्यांचे सांत्वन केले.

मात्र,या सांत्वना नंतरही या प्रकरणात दोषी असलेल्या आरोग्य यंत्रणा,इनक्यूबेटर सप्लाय करणारी कंपनी,फायर ऑडिट न करणारी एजन्सी
असो किंवा या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करणारी प्रशासकीय यंत्रणा आजही कारवाईपासून दूर आहे.
त्यामुळे वर्ष लोटूनही यात राज्य सरकारने कुणालाही दोषी पकडले नसल्याने कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रुग्णालयाचे ऑडिट गुलदस्त्यात
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जडितकांडानंतर राज्य सरकारने फायर ऑडिटचे आदेश दिले होते.
किंबहुना राज्यातील सर्व शासकीय,निमशासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट होणे बंधनकारक केले.
मात्र, राज्यासह भंडारा जिल्ह्यातील किती रुग्णालयाचे ऑडिट झाले,हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
वर्षभरानंतर बेबी केअर युनिट सुरू होणार
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आउटबॉर्न आणि इनबॉर्न युनिट दोन्ही आगीच्या भक्षस्थानी आले.
त्याच्या पुनर्निर्माणाससाठी राज्य सरकारने ४५ लाख रुपये दिले,
यातून युनिटचे काम करण्यात आले असून आता फर्निचरचे काम शिल्लक असल्याने युनिटचे काम अंतिम टप्प्यात आहे.
तब्बल वर्षभरानंतर सोमवारला हे युनिट जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला हस्तांतरीत होत आहे.
या युनिटचे निर्जंतुकीकरण प्रक्रिया केल्यानंतर १७ जानेवारीपासून हे युनिट कार्यान्वित होणार आहे.
दरम्यान, रुग्णालयाची फायर सिस्टम नव्याने बसविण्यात आली आहे.
सोबतच इलेक्ट्रिक कामाचे टेंडर झाले आहे. विद्युत पुरवठासाठी ६५० किलोवॅटच्या ट्रांसफार्मरसह चार जनरेटरही लावण्यात आले आहे.
एकंदरीतच वर्षभरापूर्वी घडलेल्या हृदयद्रावक घटनेनंतर प्रशासन जागे झाले असले तरी अशा घटना पुन्हा घडू नये,यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
बेबी केअरची ३६ युनिट सुरू होतील
इन बॉर्न आणि आऊट बॉर्नमध्ये ५० युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यातील प्रत्येकी १८ असे एकूण ३६ युनिट सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित युनितची गरज भासल्यास सुरू करता येईल.
१७ जानेवारीपासून हे युनिट कार्यान्वित होतील. या युनिटसाठी २८ नर्स, पाच बालरोगतज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोबतच सर्व कर्मचाऱ्यांना फायरचे ट्रेनिंग देण्यात आले असून फायर मॉक ड्रिल झालेली आहे. एकंदरीतच मागील वर्षी घटलेली घटना पुन्हा होऊ नये,
यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सज्ज आहे

डॉ आर.एस.फारुकी जिल्हा शल्य चिकित्सक,भंडारा
