Crime 24 Tass

परीक्षेच्या तोंडावर संस्थाचालक शिक्षकांचा वाद चव्हाट्यावर

जुन्या शिक्षकांना शाळेत मज्जाव

संस्थाचालकांवर दंडुकेशाहीचा आरोप

शाळेत भौतिक सुविधांचा अभाव

भंडारा : परीक्षा मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख घोषित केली आहे. अशात भंडारा तालुक्यातील टेकेपार येथील श्री डी. के. कोलते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्था चालकांचा आणि शिक्षकांचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. संस्थाचालकांनी जुन्या शिक्षकांना ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळेत येण्यास मज्जाव घातला असून या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदू लागला आहे.

परीक्षेच्या तोंडावर शैक्षणिक नुकसान


भंडारा तालुक्यातील टेकेपार डोडमाझरी येथे श्री डी. के. कोलते पाटील कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सदर महाविद्यालयाचे वर्ग मागील काही वर्षापासून टेकेपार येथील विनोद विद्यालयातील इमारतीत भरविल्या जात होते. मात्र, परीक्षेच्या तोंडावरच सदर शाळेच्या संस्थाचालकांनी कुठल्याही भौतिक सुविधा नसलेल्या आणि नवीन शाळेच्या इमारत बांधकामाच्या ठिकाणीच त्यांची शाळा हलविली असून दोन दिवसापासून तिथे वर्ग भरविण्याचा प्रकार सुरू केला आहे. दरम्यान, संस्थाचालकाने शाळेतील मांदाडे नामक महिला शिक्षिका आणि प्रधान नामक शिक्षकाला शाळेत येण्यास मज्जाव घालून त्यांच्याऐवजी नवीन शिक्षकांना रुजू केल्याचा प्रकार विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. मागील काही वर्षांपासून हे दोन्ही शिक्षक इमानेइतबारे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. मात्र, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक संस्थाचालकांनी या दोन्ही शिक्षकांना शाळेत येण्यास काही दिवसांपासून मज्जाव घातला आहे. परिणामी ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

हातात काठी घेऊन त्यांना धमकावण्याचाही प्रकार


गुरुवारला सदर दोन्ही शिक्षक शाळेत गेले असता संस्थाचालक वर्षा साखरे आणि त्यांच्यासह अन्य एका इसमाने या दोन्ही शिक्षकांना शाळेत येण्यास मज्जाव घालत हातात काठी घेऊन त्यांना धमकावण्याचाही प्रकार विद्यार्थ्यांसमोर घडला. याची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना दिली. जुन्या शिक्षकाला काढून नवीन शिक्षकांची भरती केल्याची माहिती मिळताच शुक्रवारला विद्यार्थ्यांसह त्यांचे संतप्त पालक शाळेत दाखल झाले. यावेळी शाळेत उपस्थित संस्थाचालक वर्षा साखरे यांना पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने त्याची कैफियत मांडली. मात्र, संस्थाचालक साखरे यांनी पालकांची कुठलीही बाजू न ऐकता त्यांच्याशी उद्धटपणाने वागल्याचा आरोप संतप्त पालकांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सर्व पालकांनी संस्थाचालक साखरे आणि प्राचार्य म्हशाखेत्री यांना विद्यार्थ्यांची टी. सी. मागितली आहे. त्यामुळे आता परीक्षेच्या दिवसात संस्थाचालक शिक्षकांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थी यात भरडल्या जात असल्याने पालकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. शिक्षण विभाग यावर काय भूमिका घेते याकडे आता पालकांसह विद्यार्थ्यांचेही लक्ष लागले आहे.

संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थी असे वर्गाबाहेर होते

संस्था चालकांचा बोलण्यास नकार
शिक्षक आणि संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला मिळाली. यामुळे नेमके प्रकरण काय आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधी शाळेत दाखल झाले. त्यावेळी संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या संस्था चालकांविरोधात आक्रोश व्यक्त केला. यावेळी संस्थाचालक वर्षा साखरे या शाळेत उपस्थित होत्या. याबाबत संस्थाचालक वर्षा साखरे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी याबाबत बोलण्यास टाळले. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

याच इमारतीत वर्ग भरविण्यात येत असल्याने सुविधांचा अभाव आहे

नवीन शिक्षकांची वेळेवर भरती
जुन्या शिक्षकांना डावलून संस्थाचालकांनी वेळेवरच गुरुवारपासून नवीन शिक्षकांची भरती केली आहे. हा सर्व प्रकार करत असताना संस्थाचालकांनी शिक्षण विभागाची पूर्व परवानगी घेतली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. जुन्या शिक्षकांना डावलण्यामागचे कारण काय? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला असून नवीन भरती प्रक्रिया राबवली असल्यास शिक्षण विभागाने त्याला मान्यता दिली आहे का? हा प्रश्न या माध्यमातून उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया
तर विद्यार्थ्यांच्या टी. सी. काढू
परीक्षेच्या तोंडावर जुन्या शिक्षकांना शाळेत येण्यास संस्थाचालकांनी मज्जाव केला आहे. वेळेवरच नवीन शिक्षकांना शाळेत घेतले आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांमध्ये रोष असून जुन्या शिक्षकांना शाळेत रुजू करून घेतले नाही तर, विद्यार्थ्यांच्या टी. सी. काढून घेऊ.

सुगंधा नीलकंठ नरडंगे,
पालक, टेकेपार


प्रतिक्रिया
संस्थाचालकांचा पालकांशी दुर्व्यवहार
या कनिष्ठ महाविद्यालयाचे अगोदर वर्ग दुसऱ्या इमारतीत भरत होते. मात्र, संस्थाचालकांनी सदर वर्ग आता दोन दिवसापासून शाळेच्या नवीन इमारतीत जिथे बांधकाम सुरू आहे तिथे हलविले आहे. या नवीन इमारतीत विद्यार्थ्यांना कुठल्याही भौतिक सुविधा नाही. संस्थाचालक शिक्षकांचा वाद असून या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे संस्थाचालक पालकांशी दुर्व्यवहार करीत आहे.

कृष्णा लक्ष्मण नरडंगे,
माजी सरपंच, डोडमाझरी

प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांचे नुकसान सहन करणार नाही
परीक्षेच्या तोंडावर शाळेच्या संस्थाचालकांनी जुन्या शिक्षकांना शाळेत येण्यास अटकाव केला आहे. संस्थाचालक आणि शिक्षकांचा वाद सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे यात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान कदापिही सहन करणार नाही. त्यामुळे वेळ पडल्यास विद्यार्थ्यांच्या टी.सी. काढू.

सुरेखा दिपक वाहने,
उपसरपंच, टेकेपार

प्रतिक्रिया
बाथरूम नसल्याने शेतात जावे लागते
शाळेच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. दोन दिवसापासून याच ठिकाणी शाळा हलविली आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बाथरूम नसल्याने शाळेलगत असलेल्या शेतात जावे लागते. जुन्या शिक्षकांना पूर्ववत घेतल्यास आमचे शैक्षणिक नुकसान होईल.

अर्पिता राजू वालदे,
विद्यार्थिनी,


प्रतिक्रिया
शैक्षणिक नुकसान होत आहे
संस्थाचालकांचा नवीन इमारतीत शाळा हलविली असल्याने तिथे सुविधा नाही. मी इयत्ता बारावीची विद्यार्थिनी आहे. परीक्षा घोषित झाले असून जुन्या शिक्षकांना बंद केल्याने आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. नवीन शिक्षकांना योग्य प्रकारे शिक्षण देता येत नाही. आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

सलोनी गजानन रंगारी, विद्यार्थिनी


प्रतिक्रिया
माझ्यासमोर शिक्षकांना धमकावले
गुरुवारी शाळेत मी बेलदारीचे काम करीत होतो. यावेळी संस्थाचालक मॅडम गाडीने आल्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका इसमाने शाळेतील जुन्या शिक्षकांनी शिक्षक केला शाळेत येण्यास मज्जाव केला. सोबत त्यांच्या हातात काठी होती त्याने दोन्ही शिक्षकांना मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार माझ्यासमोर घडला.

बाबुराव गोमाजी आडाम,
डोडमाझरी

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]