Crime 24 Tass

भंडाऱ्यात देशी कट्ट्यासह दोघांना अटक

मध्यरात्रीची कारवाई : बनावट नंबरची आढळली दुचाकी


भंडारा : रात्रीच्या वेळेस संशयास्पदस्थितीत आढळलेल्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी बनावटीचा देशी कट्टा आढळून आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री भंडारा शहरात केली
         अमन ओमप्रकाश ब्रम्हे (२२) रा. बालाजी नगर कोसमी जि. बालाघाट, नितेश भोजलाल पटले (२१) रा. आदर्श नगर कोसमी जि. बालाघाट असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्ट्यासह अटक केलेल्या दोघांची नावे आहे. गुरुवारच्या मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्र गस्तीवर होते. यावेळी भंडारा शहरातील शास्त्री चौक ते सिंधी कॉलनीच्या मार्गावरील दसरा मैदानाजवळील कब्रस्तानच्या बाजूला असलेल्या एका ऑटो रिपेअरिंग सेंटरजवळ हे दोघे संशयास्पद स्थितीत आढळून आले. पोलीस अमलदार धर्मेंद्र बोरकर यांनी समयसूचकता दाखवत त्यांच्याजवळ जाऊन दोघांनाही रात्री फिरण्याचे कारण विचारले


             यावेळी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने दोघांनाही ताब्यात घेऊन दुचाकीची तपासणी केली. दुचाकीच्या नंबर प्लेट वरील नंबर बाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नंबरची तपासणी केला असता तो बनावट असून चारचाकी वाहनाचा नंबर असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे दोघांवर संशय आला. दोघांच्याही अंगझडती दरम्यान त्यांच्याजवळ गावठी बनावटीचा एक देशी कट्टा व अन्य साहित्य आढळून आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध भंडारा पोलिसात भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष सिंग बिसेन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, अमलदार धर्मेंद्र बोरकर, पोलीस हवालदार रोशन गजभिये, विजय राऊत, कैलास पटले, पोलिस नायक श्रीकांत मस्के, प्रफुल कठाणे, स्नेहल गजभिये, अमोल खराबे, पोलीस शिपाई सचिन देशमुख, चालक बापू कुथे आदींनी केली. 

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]