पवनी :दसरा मिरवणुकीत तंट्याची भूमिका साकारून लोकांचे मनोरंजन करून स्वगृही परतलेल्या इसमाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटना पवनी येथील वैजेश्वर वार्डात ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. बंडू उर्फ राजाराम विठोबा लीचडे (४६) रा. वैजेश्वर वार्ड पवनी असे घटनेतील मृत इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील दसरा उत्सव प्रचलित आहे. येथील उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक दसऱ्याच्या दिवशी हजेरी लावत असतात. दरम्यान दसऱ्याच्या दिवशी पवनी नगरीत आलेल्या जनतेचे मनोरंजन करण्यासाठी पवनी व परिसरातील नागरिक तंट्याची भूमिका साकारतात तर काही दांडपट्टे व अन्य खेळ दाखवून नागरिकांचे मनोरंजन करून घेतात.
तथापि, घटनेतील मृतक बंडूने यावर्षी प्रथमच या अली जुना आखाड्यात सहभागी होऊन तंट्याची भूमिका साकारली. दिवसभर तंट्याची भूमिका साकारून पवनी परिसरात येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन केले. सायंकाळच्या सुमारास पवनी येथील दसरा मैदानात रावणाला जाळण्यात आले.
रावणाला जाळून झाल्यानंतर तंटाची भूमिका साकारणारा बंडू आपल्या राहत्या घरी आला. आंघोळ केली. आणि खुर्चीवर बसून होता. एवढ्यातच बंडूला हृदयविकाराचा झटका आला अन तो क्षणातच खुर्चीवरून खाली कोसळला. ही घटना बंडूच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ बंडुला उपचारासाठी पवनी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
बंडूचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बंडूच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
