“साद माणुसकीची’ समूहाने जपली सामाजिक बांधिलकी”
आनंदाचा, उत्साहाचा व चिरस्थायी प्रकाशाची ऊर्जा देणारा सण म्हणजे ‘दिवाळी’. हा प्रकाशाचा उत्सव मोठ्या थाटामाटात, दिमाखात प्रत्येकजण साजरा करत असतो. मात्र त्याच समाजात, परिसरात असे काही वंचित घटक आहेत की, ज्यांना विपरीत परिस्थितीमुळे ह्या प्रकाश पर्वातही कायम अंधारच अनुभवावा लागतो. त्यांच्या या अंधारलेल्या दिवाळी सणात एका छोट्याशा पणतीच्या रूपात प्रकाश आणण्याचा प्रयत्न तालुक्यातील ‘साद माणुसकीची समूह लाखनी’ हा 100 पेक्षा जास्त सहृदयी शिक्षक व शिक्षिकांचा समूह मागील सहा वर्षांपासून करत आहे.
जाऊनी वंचितांच्या दारी करू दिवाळी साजरी ।
देऊ त्यांना मायेची ऊबहीच खरी भाऊबीज ॥
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातील सर्वांनी हा प्रकाश पर्व आनंदाने साजरा करावा. तसेच आपल्यावर असलेल्या सामाजिक ऋणाची थोडीफार परतफेड करावी या उदात्त हेतूने ह्या हेतूने हा समूह काम करत असतो.
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक पुरुषोत्तम झोडे यांनी आपल्या समविचारी सहृदयी शिक्षक शिक्षिकांना व्हाट्सअपच्या माध्यमातून एकत्रित आणत २०१७ साली या समूहाची निर्मिती केली. हा समूह वर्षभर विविध प्रसंगी सामाजिक जाणीव जपत समाजोपयोगी विविध उपक्रम राबवत असतो.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समुहाच्या वतीने अत्यंत गरजू, अनाथ, विधवा, दीनदुबळ्या, निराधार, दिव्यांग, वृद्ध अशा वंचित विद्यार्थ्यांना व व्यक्तींना भाऊबीजेच्या दिवशी जीवनोपयोगी वस्तू व काही उदरनिर्वाहासाठी साधनांची भेट देण्यात आली. सोलापुरी चादर, ब्लॅकेट, स्कुल बॅग, नोटबूक, पेन, कंपास पेटी, वॉटर बॉटल, किराणा साहित्य व समूह सदस्यांच्या घरी दिवाळी निमित्ताने तयार करण्यात आलेले फराळाचे साहित्य भेट देण्यात आले. हे सर्व साहित्य गरजूंच्या घरी जाऊन भेट देण्यात आले.
समुह सदस्य पुरुषोत्तम झोडे, प्रमोदबापू हटेवार, प्रा. युवराज खोब्रागडे, प्रा. उमेश सिंगनजुडे, लालबहादूर काळबांधे, रविंद्र म्हस्के, दुर्योधन गायधने, आनंदराव उरकुडे, रमेश गायधने, राम चाचेरे, संतोष सिंगनजुडे, यादव मेश्राम, चेतन भुळे, ज्ञानेश्वर लांडगे, श्रीधर काकिरवार, योगिराज देशपांडे, प्रमोद खेडीकर, सूर्यभान टिचकुले, सुधीर झलके, योगेंद्र खंडाईत, विलास आंबेडारे, गजिराम खंडाते, अशोक देशमुख, सतीश चिंधालोरे, रामकृष्ण पिंपळशे़डे, प्रेमदास काळे उपस्थित होते.
यावर्षी लाखनी तालुक्यातील मुरमाडी, सावरी, लाखनी, बोरगाव, लाखोरी, परसोडी केसलवाडा/प, गराडा, सामेवाडा, दिघोरी, मुरमाडी/ तुप, झरप, पेंढरी, कनेरी, गुरढा, जेवनाळा, पिंपळगाव, डोंगरगाव, रेंगेपार/ कोठा, पालांदूर, मचारणा, झाडगाव, किन्ही (साकोली) चांदोरी (भंडारा) धर्मापुरी ( लाखांदूर) अशा 25 गावातील गरजूंना ‘भाऊबीज भेट’ प्रदान करण्यात आली.
सुनिता मरस्कोल्हे, संध्या गिऱ्हेपुजे, शुभांगी लुटे, उर्मिला तितीरमारे, मंगला बोपचे, उमा टिचकुले, कविता किरणापुरे, अंजना पिंपळशे़डे, देवका मेश्राम, अर्चना लांडगे, सारिका दोनोडे, योगिता डोर्लीकर, चारुलता कठाणे, सुनीता देशमुख, अल्का किरणापुरे इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.
या समुहाच्या माध्यमातून पार पाडत असलेल्या सामाजिक दायित्वाची प्रेरणा, इतरही अनेक सहृदयी नागरिकांत निर्माण व्हावी आणि पणतीच्या प्रकाशाचे रुपांतर प्रखर तेजात होऊन सामाजिक समता जोपासण्याचे महत्वपुर्ण कार्य सदर उपक्रमाच्या माध्यमातून होईल हा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ह्या समुहाच्या कार्याची प्रसंशा विविध सामाजिक स्तरातून होत असते.
