नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सुमारे दोन कोटी रुपयांच्या गाडीतून समृद्धी महामार्गाची पाहणी केली. स्वत: फडणवीसांनी याचे सारथ्य केले. या गाडीची कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावे नोंद आहे. ही कंपनी फडणवीस यांचे निकटवर्तीय नागपूरचे प्रख्यात बिल्डर तसेच महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांची आहे. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्याचे लोकार्पण होत आहे.
5 तासांत पार केले 520 किमी अंतर
मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-शिर्डी असा प्रवास केला. यादरम्यान दोघांनीही स्वत: गाडी चालवली. त्यांनी जवळपास १५० किमीच्या वेगाने ५२० किलोमीटरचे अंतर अवघ्या ५ तासांमध्ये पार केले. ‘आम्ही खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गाने चालणारे असून रविवारीही त्यांच्याच मार्गाने प्रवास केला. राज्याचा या पुढील प्रवासही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गानेच होईल,’ अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
