पोलीस शिपाई ठार, एपीआयसह हवालदार गंभीर
कारवाई करून परतणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात गोंदिया. कारवाई करून परत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस वाहनालागोंदिया शहराजवळील ढीमरटोली येथे भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या ट्रकला मागून धड़क दिल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जागीच मृत्यु झाला. तर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला. ही घटना आज, पाहटेच्या सुमारास घडली. गंभीर जखमींना नागपूर येथे हलविण्यात आले. मृत कर्मचाऱ्याचे नाव विजय मानकर (वय 35, रा. वणी, जि. यवतमाळ असे आहे.
गोंदिया पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे विभागाचे कर्मचारी खासगी वाहनाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात कारवाई करण्यासाठी खासगी वाहनाने गेले होते. सट्टापट्टी घेणाऱ्यावर कारवाई करून एका आरोपीला अटक करण्याकरिता त्याच्या घरी गेले. मात्र आरोपी फरार असल्यामुळे ते कर्मचारी पहाटेच्या सुमारास गोंदियाकडे गोरेगावमार्गे परत येत होते. मात्र पोलीस कर्मचारी असलेल्या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. उभ्या ट्रकचे इंडिकेटर बंद होते. त्यामुळे कार चालकाच्या लक्षात ट्रक आला नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. या अपघातात पोलीस शिपाई विजय मानकर यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
तर पोलीस उपनिरीक्षक गोपाल कापगते आणि हवालदार तुळशीदास लुटे हे गंभीररित्या जखमी झाले. मृत विजय मानकर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मात्र त्यांचे स्थानांतर गुन्हे अन्वेषण विभागात घेण्यात आले. गेल्या आठवडाभरात शहर परिसरातील हा तिसरा मोठा अपघात आहे. या अपघातामुळे विस्कळीत वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत असलेल्या ट्रकवर कारवाईची मागणी आता होत आहे.
