Team India – भारतीय संघाने नुकताच बांगलादेशचा दौरा पूर्ण केला आहे. या दौऱ्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली.
सुरुवातीला झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला यजमान संघाने २-१ अशी मात दिली. त्यानंतर कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने २-० असा क्लीन स्वीप दिला. महत्वाचं म्हणजे, भारताने कसोटी मालिका जरी जिंकली असली तरीदेखील संघाचे प्रदर्शन अत्यंत निराशाजनक असेच राहिले. कारण भारतीय संघासाठी हा दौरा अत्यंत सोपा मानला जात होता. मात्र, बांगलादेशच्या संघाने चांगला खेळ करत भारताला तगडे आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले.
बांगलादेश विरुद्धच्या दौऱ्यानंतर आता भारतीय संघ नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्ध मायदेशातच ३ सामन्यांची टी-२० मालिका आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणारा आहे. याच वर्षात भारतात एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर २०२३ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या भारतीय संघाच्या कामगिरीवरून अनेकांनी ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे संघासाठी श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही मालिका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत.
टी-२० आणि वनडे मालिकेतील सामने
भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ जानेवारीला मुंबईतील सामन्यांपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ५ जानेवारीला पुणे दुसरा आणि ७ जानेवारीला राजकोट येथे तिसरा व अंतिम सामना खेळवला जाईल. त्याचबरोबर १० जानेवारीला गुवाहाटीतील सामन्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना १२ जानेवारीला कोलकाता तर तिसरा आणि शेवटचा सामना १५ जानेवारीला त्रिवेंद्रम येथे खेळला जाणार आहे.
टी-२० मालिकेसाठी हार्दिककडे नेतृत्व येणार?
दुखापतीमुळे बांगलादेश विरुद्धच्या दौऱ्यातून बाहेर पडलेल्या रोहत शर्माची श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. अशा परिस्थितीत या मालिकेसाठी संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे दिले जाईल. त्याचबरोबर टी-२० विश्वचषकापासून भारताच्या टी-२० क्रिकेट संघाचे नेतृत्व हार्दिककडे देण्याची मागणीने जोर धरला होता. त्यामुळे त्याच्याकडे या फॉरमॅटचे कायमचे कर्णधारपद दिले जाईल का? असा सवालही निर्माण झालाय.
