‘आदित्य… नाम तो सुना होगा’, अशा शब्दांत आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील बछड्याच्या नामकरण सोहळ्यात एका चिठ्ठीत आदित्य हे नाव निघाले होते. मात्र, हे नाव पाहताच ते मागे घेण्याची विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ते नाव मागे घेत दुसरी चिठ्ठी काढली होती. या घटनेवरूनच आज आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
ठाकरे मध्यप्रदेश दौऱ्यावर
वाघाच्या बछड्याला आदित्य हे नाव देण्यास सरकार घाबरले. एवढी भीती त्यांच्या मनात आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे आज मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आदित्य यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथही उपस्थित होते.
किस्सा संभाजीनगरचा
आदित्य ठाकरे म्हणाले, छत्रपती संभाजीनगरात केवळ चिठ्ठीत आदित्य नाव निघाले तर हे सरकार घाबरले व तातडीने नाव मागे घेण्यास सांगितले. एवढी भीती त्यांच्या मनात आहे. मात्र, त्यांनी आता काहीही केले तरी त्यांचे सरकार लोकच पाडून टाकणार आहेत. लोक फक्त निवडणुकीची वाट पाहत आहेत. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या मदतीने गद्दारी करुन सरकार पाडले. अशा गद्दारांना जनता पुन्हा निवडून देणार नाही.
लोकांमध्ये दहशत
आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात गेल्यावर्षी गद्दारी झाली. त्यानंतर ५० खोके, एकदम ओके ही घोषणा चांगलीच लोकप्रिय झाली. मात्र, आता हे सरकार एवढे घाबरले आहे की, अशी घोषणा कोणी करताच त्याच्या मागे पोलिस पाठवले जातात. सरकारवर कोणी टीका केली, सरकारविरोधात कोणी सोशल मीडियावर पोस्ट केली की, त्याच्या मागे ईडी, आयटी अधिकाऱ्यांना पाठवले जाते. लोक बोलायलाही घाबरतील, असे दहशतीचे वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेच का भाजपचे हिंदुत्व?
आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. हेच भाजपचे हिंदुत्व आहे का? बारसू रिफायनरीला शांततेच्या मार्गाने विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज झाला. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला झाला. हेच भाजपचे हिंदुत्व आहे का? यानंतर उपस्थितांना उद्देशून आदित्य ठाकरे म्हणाले, या सर्वांचा तुम्ही बदला घेणार की नाही?
निवडणुकीत बदला घेणार
आदित्य ठाकरे म्हणाले, आपल्याला बदला सुडाच्या भावनेने नव्हे तर परिवर्तन हवे या उद्देशाने घ्यायचा आहे. महाराष्ट्रात येत्या निवडणुकीत बदल घडवायचाच आहे. सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते, अशी ही लढाई आहे. मध्यप्रदेशमध्येही कमलनाथ यांचे सरकार गद्दारी करुनच भाजपने पाडले. मध्य प्रदेशात पुढील निवडणुकीत काँग्रेसच विजयी होणार आहे. मला फक्त तुम्ही शपथ समारोह कधी ठेवणार आहात? तेवढेच सांगा, असे आदित्य कमलनाथ यांना म्हणाले.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी वेळकाढूपणा का करत आहात? असे खडेबोल सुनावत सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात याप्रकरणी सुनावणी घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याला वेग दिला आहे. आता विधानसभा अध्यक्ष पुढील सुनावणी 25 सप्टेंबर रोजी घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
