▪ आठवडाभरातील दुसरी घटना
▪ राजनी शेतशिवारातील घटना
लाखांदूर :
पीक कर्जाची उचल करीत मागील खरीप हंगामात लागवड केलेल्या शेत पिकांचे पर्याप्त स्वरूपात उत्पादन न झाल्याने कर्जाच्या परतफेडीला घेऊन त्रस्त असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी साडे ७ वाजताच्या सुमारास तालुक्यातील राजनी शेतशिवारात उघडकीस आली. या घटनेत स्थानिक राजनी येथील फुकटू काशीराम ठाकरे (६०) नामक वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तथापि, गत दोन दिवसापूर्वी तुळशीराम ठाकरे (७०) नामक वृद्ध इसमाने मद्यधुंद अवस्थेत गळफास घेत आत्महत्या केली असल्याने सदरची आत्महत्येची घटना तालुक्यातील दुसरी घटना ठरली आहे.
पोलीस सुञानुसार, घटनेतील मृतक वृद्ध शेतकऱ्याने सन २०२१ च्या खरीप हंगामात स्थानिक सेवा सहकारी संस्थे अंतर्गत एकूण २५ हजार रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली होती. मात्र खरिपात अपर्याप्त पाऊस व विविध किट रोगांच्या प्रकोपामुळे पीक उत्पादनात घट आली. तर रब्बी अंतर्गत शेतात लागवडीखालील पिकांची अवकाळी पावसाने हानी झाल्याने घटनेतील वृद्ध शेतकरी कर्ज परतफेडीला घेऊन मागील काही दिवसांपासून त्रस्त दिसुन येत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास शेतावर गेलेल्या वृद्ध शेतकऱ्याने शेतातील कडू लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतला. सदरची घटना काही वेळाने शेतशिवारात गेलेल्या अन्य शेतकऱ्यांना दिसून आली. त्यावरून संबंधित घटनेची माहिती मृतकाच्या कुटुंबियांसह स्थानिक लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. माहितीवरून स्थानिक लाखांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिलीप भोयर व पोलीस अंमलदार निलेश चव्हाण यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
या घटनेची नोंद स्थानिक लाखांदूर पोलिसांनी केला असून या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिलीप भोयर करीत आहेत.
