भंडारा :मनुवादी भाजपला धडा शिकवण्यासाठी के.चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतला आहे.भाजपला केंद्रातून हद्दपार करण्याचा चंग यूपीएने बांधाला आहे.
के.चंद्रशेखर राव यांना काँग्रेसने जो प्रस्ताव दिला ते त्याचा विचार करतील.
पहाटेचे सरकार गडगडल्याने भाजपचा सध्या थयथयाट सुरू आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर खोटेनाटे बदनामीचे आरोप लावण्याचा खटाटोप सुरू आहे.
त्यामुळे राजकारणातील स्तर खालावल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
साकोली येथे कार्यकर्ता,पदाधिकारी मेळावा आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपंचायतच्या सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पटोले माध्यमांशी बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना पटोले यांनी,भाजपकडून सातत्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे
पर्यायाने भाजप महाराष्ट्राला बदनाम करीत आहे.
भाजपने १९ बंगल्याबाबत मुख्यमंत्र्यांवर केलेला आरोप हा हास्यास्पद आहे.
भाजपकडून सुरू असलेली बदनामी थांबावी यासाठी संजय राऊत यांनी जे आरोप भाजप नेत्यांवर लावलेले आहे.
त्याचे राज्य सरकारने राज्यातील तपास यंत्रणेकडून तपास करावा आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याची माहिती पटोले यांनी यावेळी दिली.
केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग
भाजप केंद्रात आणि फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचाराचे नवे पायंडे फडणवीस सरकारने घातले. मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग सुरू केल्याचा घणाघात पटोले यांनी यावेळी केला. भाजपचे सरकार नव्हते तेव्हा राज्यातील राजकारण एक आदर्शवत राजकारण होते.
देशात अनेक राज्यात महाराष्ट्राचा आदर्श घेतल्या जात होता. मात्र भाजप ने सुरु केलेले आताचे राजकारण हे अगदी खालच्या स्तराची असल्याची टीका पटोले यांनी यावेळी केली.
चिनच्या व्यापाराला भाजपचे समर्थन
राहुल गांधी यांचे चीन सोबत कुठलेही संबंध नाही. असे असतानाही भाजपने राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावले आहेत. चिनच्या घुसखोरीबाबत अरुणाचलचे भाजपच्या खासदारांनी तक्रार दिली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावे किंबहुना देशातील नागरिकांना सत्य माहिती सांगावी.चीनचे भाजपने समर्थन केले आहे. भारतात जी ५९ टक्के आयात होत आहे ती एकट्याच चीनमधून होत आहे. चीनच्या या वस्तू इतर देशात खपत नाही, त्या वस्तू भारत सरकार देशात आणत असून भारताला एक प्रकारे डम्पिंग यार्ड बनविण्याचा घाट मोदी यांनी केला असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला.
