पंतप्रधान मोदींचा निषेध : शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध
भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या काँग्रेस विरोधी विधानाचा भंडारा काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध केला.
मोदी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीने भाजपचे खासदार सुनील मेंढे यांच्या घरावर मोर्चा काढून निदर्शने केली.
यावेळी शेकडो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकातून हा मोर्चा काढण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना कोरोनाचा फैलाव होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी जबाबदार असल्याचा आरोप लावला होता.
याच्या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून राज्यभरात भाजपच्या पदाधिकारी आणि खासदारांच्या घरासमोर ‘माफी मांगो आंदोलन’ करण्यात येत आहे.
या अनुषंगाने भंडारा येथे हे आंदोलन करण्यात आले.पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विधानानंतर महाराष्ट्राची माफी मागावी हा संदेश भाजपच्या खासदारांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवावा या उद्देशाने त्यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येत असल्याची माहिती यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दिली.

यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव जिया पटेल,माजी आमदार दिलीप बनसोड,प्रदेश सचिव अमर वराडे,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा जयश्री बोरकर,सुभाष आजबले,जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी,प्रिया खंडारे,तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे,
शंकर राऊत,राजू निर्वाण,जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे,बाळू ठवकर धनराज साठवणे आदींसह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कुठलीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील,पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मिसाळ,पोलीस उपनिरीक्षक अरविंदकुमार जगणे आदी यावेळी उपस्थित होते.
निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.
