साई मंदिर परिसरातील घटना : दुचाकीवरून आलेल्या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल
भंडारा : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुकानात प्रवेश करून झेरॉक्स काढली.याचवेळी अन्य दोघाने दुकानासमोर ठेवलेल्या स्कुटीच्या डिक्कीतील एक लाख रुपयांची रोख रक्कम पळविली.ही घटना भंडारा शहरातील साई मंदिरसमोर आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक दरम्यान असलेल्या साई मंदिर समोर कमलेश देवराव गिऱ्हेपुंजे यांचे श्रीराम झेरॉक्स अँड ऑनलाईन सेंटर आहे.दुपारी मिस्किन तंक चौकात असलेल्या स्टेट बँकेत गेले होते बँकेच्या त्यांच्या खात्यातून त्यांनी एक लाख रुपये काढले आणि ते ४.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या दुकानात परतले.
यावेळी कमलेश यांनी बँकेतून आणलेली रक्कम ही त्यांच्या एमएच ३६ एई ५०६१ क्रमांकाच्या स्कुटीच्या डिक्कीतच ठेवली होती.दरम्यान,५ वाजताच्या सुमारास त्यांच्या झेरॉक्स दुकानात दुचाकीवरून आलेले दोन व्यक्ती झेरॉक्स काढण्यासाठी आले.कमलेश हे झेरॉक्स काढण्यात गुंग असल्याचे बघून तिथे पोहचलेल्या अन्य दोघांनी त्यांच्या स्कुटीच्या डिक्कीत ठेवलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम नकळत दोघांनी लांबविली.
झेरॉक्स काढून सदर इसम दुकानातून गेल्यानंतर कमलेश हे गाडीजवळ येऊन डिक्कीतील रक्कम घेण्यासाठी आले. तेव्हा,रक्कम डिकीत नसल्याचे आणि कुणीतरी ते चोरून नेल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.या प्रकरणाची त्यांनी भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी पोलिस पथकाला घटनास्थळी पाठविले.
परिसरात असलेल्या दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासले असून रक्कम पळविणाऱ्या चोरट्यांना लवकरच अटक होईल,असा विश्वास ठाणेदार बारसे यांनी व्यक्त केला आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
