Crime 24 Tass

धक्काबुक्की करून महसूल कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

रेती तस्करांचा प्रताप : एकाला अटक, दोघे फरार

भंडारा : रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच महसूल अधिकाऱ्यांनी विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडविले.

कारवाई सुरू असताना शासकीय कामात अडथळा आणून रेती तस्कराने महसूल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर पळवून नेला. ही घटना डोंगरगाव रामनगर ते लेंडेझरी मार्गावर घडली.
दलीराम जयदास पचारे रा. नेरला, बंटी शेख, रामदास ठपकस रा.अड्याळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडळ अधिकारी पृथ्वीराज अहिर, तलाठी आर. जी. हटवार, कोतवाल अमोल फेंडर यांना रेतीची विना रॉयल्टी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

यावरून तिघेही डोंगरगाव रामनगर ते लेंडेझरी मार्गावर रेतीची होत असलेली चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी पोहोचले.

यावेळी त्यांना एका ट्रॅक्टरमधून रेतीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

तिन्ही महसूल कर्मचाऱ्यांनी रेतीची वाहतूक होत असलेल्या ट्रॅक्टरला थांबविले आणि रॉयल्टीची विचारणा केली,यावेळी ट्रॅक्टर चालक दलीराम जयराम पचारे रा.नेरला त्याच्याकडे रॉयल्टी नसल्याची बाब लक्षात आली.


यावरून महसूल कर्मचाऱ्यांनी विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करीत असल्याने ट्रॅक्टरवर कारवाई करीत सदर ट्रॅक्टर भंडारा तहसील कार्यालयात नेत होते.

यावेळी अड्याळ ते पहिला जाणाऱ्या मार्गावर दुचाकी क्रमांक एमएच ३६ एडी ९९९१ ने तिथे पोहोचलेल्या बंटी शेख आणि रामदास ठापकस या दोघांनी शासकीय कामात अडथळा आणून बळजबरीने ट्रॅक्‍टर वाटेत थांबविला.

यावेळी फिर्यादी मंडळ अधिकारी अहिर यांना धक्काबुक्की करून त्यांच्याशी वाद घातला एवढ्यावरच ते न थांबता त्यांनी ‘गलत माणसासोबत पंगा घेतला’ असे बोलून ट्रॅक्टरमधील रेती बळजबरीने खाली केली.
दरम्यान, सदर प्रकरणाचे चित्रीकरण अन्य महसूल कर्मचारी करीत होते. यावेळी चित्रीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला रेती तस्करांनी धमकावून चित्रीकरण थांबविण्यास सांगितले.

चित्रीकरण न थांबविल्यास त्याच्या घरी येऊन मोबाईल फोडेल व त्याला जिवानिशी ठार मारेल अशी धमकी देत ट्रॅक्टरसह तिथून पळ काढला.

याप्रकरणी मंडल अधिकारी अहिर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून दलीराम पचारे याला अटक केली आहे.

तर अन्य दोन फरार बंटी शेख व रामदास ठपकस यांचा पोलीस शोध घेत आहे,घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक तलमले करीत आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]