खडीगंमत महोत्सवाला उर्स्फुत प्रतिसाद
भंडारा दि.23 विदर्भातील पुरातन लोकनाट्य खडीगंमत महोत्सवाला काल सायंकाळी दवडीपार बाजार येथे उर्स्फुत प्रतिसादात सुरूवात झाली.
या महोत्सवाच्या उदघाटनाला सरपंच अश्विनीताई मडावी,उपसरपंच भागवत हजारे, पोलीस पाटील श्री.धुर्वे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पडोळे यांच्यासह मान्यवर नागरिक उपस्थित होते.
आजादी का अमृत महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अभिनव संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य संचालनालय, व शासनातर्फे राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 22 मार्च ते 26 मार्च खडीगंमत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

खडीगंमत हे विदर्भातील पुरातन लोकनाट्य असून पूर्व विदर्भात खडीगंमत ही लोककला आजही फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षक आजही या कलेचा मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून आनंद घेत असल्याचे दिसून येते. आधुनिक युगात लोप पावत चाललेल्या, लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने तसेच समृद्ध अशा या लोककलेला व लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुबई तर्फे दरवर्षी खडीगंमत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
कोरोनामुळे मागील दोन वर्षात खडीगंमत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नाही . या वर्षात कलावंतांच्या मागण्या विचारात घेऊन यावर्षी खडीगंमत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
खडीगंमत महोत्सवातील कार्यक्रमांची मेजवानी-
23 मार्च 2022 रोजी शाहीर घनश्याम साखरकर हे ग्राम स्वच्छता या विषयावर कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत .24 मार्च 20 22 रोजी महिला शाहीरा सोनू गायधने हे व्यसनमुकती या विषयावर कार्यक्रमाचे सादरीकरण करतील. 25 मार्च 20 22 रोजी शाहीर निशांत सुखदेव हे शेतकरी आत्महत्या या विषयावर कार्यक्रमाच्या माध्यमातून जागृती करतील. तर 26 मार्च 2022 रोजी शाहिर पुरुषोत्तम खांडेकर हे बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर खडी गंमतीचे सादरीकरण करणार आहेत.
5 दिवसीय खडीगंमत महोत्सव प्रेक्षकांना विनामूल्य उपलब्ध असून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य, मुंबई यांनी केले आहे.
