प्रतिनिधी/भंडारा: ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील विद्यर्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती देण्यत यावी, अशी कळकळीची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विधानसभा अधिवेशन दरम्यान सभागृहात केली.
सामाजिक न्याय विभागामार्फत उच्च शिक्षणाकरीता शिक्षण कर्ज दिले जाते. मागील 2 वर्षाच्या कोरोना परिस्थितीमुळे सर्व विद्यार्थ्यांचे मागील कर्ज माफ करून नवीन कर्जपूरवठा करण्यात यावा. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांसोबतच आरोग्य शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. आज भंडारा जिल्ह्यात एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस. असे कोणतेही आरोग्य शिक्षण देणारी संस्था नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस. महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी सुध्दा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली.
राखीव मतदार संघामध्ये निधीच्या कमतरतेमुळे बरीच विकास कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे दलीत वस्ती सुधर योजनांचा शिल्लक निधी या अनुसूचित जाती राखीव मतदार संघामध्ये वळता करावा. सोबतच आदिवासी भागांमध्ये विकास कामांना गती देण्यासाठी निधीची कमतरता पडू नये यासाठी शासनाने निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली.
