राज्याला निर्देश देऊन प्रस्ताव पाठविण्याची लोकसभेत खासदार सुनील मेंढेंची मागणी
केंद्र सरकारने केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत 75 वैद्यकीय महाविद्यालयांना अनुमोदन दिले आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने अजून पर्यंत भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला नाही. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारला निर्देश देऊन जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने कारवाई करावी अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी आज लोकसभेत केली.
सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न उपस्थित केला. भंडारा हे जुने शहर असून जिल्ह्याचे ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय नाही. उपचारासाठी येथील रुग्णांना नागपूर किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये जावे लागते. यासाठी लागणारा वेळ आणि खर्च सामान्य नागरिकांना परवडणारा नाही.
केंद्र सरकारने केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत 75 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. राज्य सरकारने भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात तसा प्रस्ताव आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे पाठविणे अपेक्षित आहे. मात्र अजून पर्यंत तो पाठविण्यात न आल्याने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प रेंगाळलेला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली.
