भंडारा : बावनथळी प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत आहे. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील बावनथडीच्या नहरात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या बावनथडी प्रकल्पाच्या नहरात वाघ कदाचित पाणी पिण्यासाठी उतरला असावा. यातच त्याचा तोल जाऊन धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यात तो बुडाला. नहरातून सदर वाघाला वर येता न आल्याने त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बपेरा गावाजवळील नहरात वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. यावरून बपेरासह उसर्रा आणि परिसरातील गावातील ग्रामस्थांनी मृतावस्थेत असलेल्या वाघाला बघण्यासाठी घटनास्थळी एकच गर्दी केली.
बावनथडी धरणाच्या नहरात वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती प्राप्त होताच नाकाडोंगरी आणि कांदरी वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असून मृत वाघाला नहराबहेर काढून त्याचे शवविच्छेदन केल्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल.
