भंडारा: माहिती, प्रसारण आणि दूरसंचार मंत्रालयाच्या अनुषंगाने इंटरनेट सेवा, मोबाईल नेटवर्क आणि अनेक विषयांच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उत्तर देत काही बाबींचा खुलासा केला आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खासदार सुनील मेंढे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा विषय लावून धरला. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात मोबाईल इंटरनेटचा विस्तार किती प्रमाणात झाला आहे.
भारत नेट योजनेची वर्तमान स्थिती आणि या योजनेत सहभागी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या देण्यात यावी. महाराष्ट्र राज्यात शंभर टक्के इंटरनेट कव्हरेज केव्हापर्यंत मिळण्याची शक्यता आहे, पीएम वाणी योजनेची स्थिती काय? ग्रामीण भागातील अतिदुर्गम क्षेत्रात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का? नसेल तर अशा क्षेत्रात इंटरनेट देण्यासंदर्भात सरकारची काही योजना आहे का असा प्रश्नही खासदार सुनील मेंढे यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला मंत्री वैष्णव यांनी उत्तर दिले.
ग्रामीण भागात ग्राम पंचायतीमध्ये ब्रोडबंड कंनेक्टिविटी उपलब्ध करून देण्यासाठी भारत नेट योजनेअंतर्गत काम सुरू असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम ग्रामपंचायतीपासून आबादी गावापर्यंत राबविला जाणार असल्याचे ते म्हणाले. 2025 पर्यंत हा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. फेब्रुवारी 22 पर्यंत एकूण 1 लाख 72 हजार 361 ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा सुरू झाल्याचे प्रश्नाच्या उत्तरात मंत्री म्हणाले. पीएम अंबानी योजनेअंतर्गत मागणीनुसार सेवा पुरविण्यात येत असून महाराष्ट्रात आतापर्यंत 5212 वाय-फाय केंद्र देण्यात आले असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात आजच्या घडीला 37 हजार 552 गावांमध्ये वायरलेस मोबाईल वाय-फाय सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले. इतरही अनेक विषयांवर यावेळी मंत्रीमहोदयांनी माहिती दिली.
