राष्ट्रीय महामार्गावरील घटना : अज्ञात वाहनाच्या धडकेत घडली घटना
भंडारा : भंडारा येथून साकोलीकडे जाणाऱ्या नणंद आणि वहिनीच्या दुचाकीला भरधाव वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात जखमी झालेल्या दोघींचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मोहघाटा जंगल परिसरात सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
सोनाली राहुल संगीडवार (२८) रा. आकापुर ता. मूल जि. चंद्रपूर असे वहिनीचे तर, सुरुची रवींद्र मल्लेलवार (२५) रा. खुटसावरी ता. लाखनी जि. भंडारा असे नणंदचे नाव आहे. सोनाली आणि सुरूची या दोघीही एम एच ३६ एच ४२३५ या मोपेडने साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथे जात होत्या. मोहघाटा जंगलामध्ये रस्त्यालगत वृक्षांची कटाई सुरू असल्याने या राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांसाठी जागा अरुंद पडत आहे. अशास्थितीत या दोघीही याच मार्गावरून जात असताना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात नणंद आणि वहिनी गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेले वाहन अपघातानंतर पळून गेले.
गंभीर जखमी अवस्थेत दोघींनाही साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सोनाली संगीडवार यांचा साकोली येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तर, गंभीर सुरूची हिला पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारापूर्वीच सुरुची यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी साकोली पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
