लाँग मार्च मोर्चा : राष्ट्रीय महामार्गावर तिरडी सह चूल पेटविली
भंडारा : दिवसागणिक वाढत चाललेली महागाई आणि यामुळे सर्वसामान्यांची होत असलेली कुचंबणा याला जबाबदार असलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसने आज भंडाऱ्यात लाँग मार्च मोर्चा काढत निदर्शने केली. राष्ट्रीय महामार्गावरील त्रिमूर्ती चौकात काँग्रेसच्या महिलांनी चूल पेटवून त्यावर पोळ्या बनविल्या. तर युवक आणि काँग्रेस कमिटीने तिरडीवर ठेवलेले दुचाकी वाहन पेटवून दिले. मंगळवारला दुपारला करण्यात आलेल्या काँग्रेसच्या या आंदोलनामुळे पोलिसांची काहीकाळ त्रेधातिरपिट उडाली.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर यासह खाद्यपदार्थांची मोठी दरवाढ केली आहे. एक नव्हे तर, दररोजच ही दरवाढ होत असल्याने गोरगरीब जनतेची आर्थिक लूट सुरू झाली आहे. यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील जनता आर्थिक विवंचनेत अडकली आहे. ही दरवाढ केंद्र सरकारने रद्द करावी आणि इंधनासह सर्वच बाबींच्या वाढविलेल्या किमती कमी करून गोरगरिबांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली ही दरवाढ बंद करावी या मागणीला घेऊन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सरचिटणीस एड शशिर वंजारी, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, बाळासाहेब कुलकर्णी, नाना गावंडे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, धनंजय तिरपुडे, प्रशांत देशकर, राजू पालीवाल, रमेश पारधी यांच्या नेतृत्वात भंडारा शहरातील हुतात्मा स्मारक ते राष्ट्रीय महामार्गावरील त्रिमूर्ती चौक असा लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला.
पेट्रोलचे भाव गगनाला भिडले
केंद्र सरकार विरोधात काढण्यात आलेल्या या आंदोलनात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असल्याने वाहन चालवणे परवडण्याजोगे नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ एका तिरडीवर दुचाकी वाहन ठेवून त्याची प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावरील त्रिमूर्ती चौकात हा मोर्चा पोहोचल्यानंतर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर यांच्या पुढाकारात सर्व महिलांनी राष्ट्रीय महामार्गवरच चूल पेटवून त्यावर पोळ्या तयार केल्या. तर पेट्रोलच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तिरडीवरील दुचाकी वाहन राष्ट्रीय महामार्गावरच पेटविले. यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी समयसूचकता दाखवा पेटते वाहन विजविले. दरम्यान, महागाईचा भस्मासूर वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा काँग्रेसचे पदाधिकारी पेटविण्याचा तयारीत असतानाच पोलिसांनी तो ताब्यात घेतला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असला तरी त्यांची चांगलीच धावपळ झाली.
