भंडारा : शेतशिवारात उभारण्यात आलेलले अख्खे टीनशेड चोरट्यांनी चोरले. त्याची परस्पर विक्री केली. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी टीनशेड चोरणाऱ्या दोन सख्ख्या भावांसह चौघांना अटक केली. न्यायालयाने चौघांनाही पोलिस कोठडीत सुनावली आहे.
भिमराज उर्फ गोलू नेमिचंद मेश्राम (२४), धर्मराज उर्फ सोनू नेमिचंद मेश्राम (२३) दोघेही रा. सेलोटी ता. लाखनी, संतोष फुलचंद शाहू (३५), कार्तिक प्रकाश खेडीकर (२५) दोघेही रा. मानेगाव (सडक) ता. लाखनी या चौघांना लाखनी पोलिसांनी टीनशेड चोरी प्रकरणात अटक केली आहे. तर, लाखनी येथील लाखोरी मार्गावरील कबाडी व्यवसायिक प्रकाश भिवाजी मुंघाटे (६१) याला कबाडी घेतल्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि सूचनापत्रावर सोडले.
लाखनी तालुक्यातील सालेभाटा शेतशिवारात स्टील रीरोलिंग कंपनीने टीनशेड उभारले आहे. सदर कंपनीत कोणीही राहत नसल्याची संधी साधली. चौघांनी टीनशेड व अन्य चोरलेले साहित्य त्यांनी लाखनी येथील कबाडी दुकानदार प्रकाश मुंघाटे यांना विकले.
तक्रारीवरून लाखनीचे पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित चौघांनाही विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत अटक केली. चौघांनाही आज लाखनी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोज वाढवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार दिगंबर तलमले, पोलीस अंमलदार नितीन बोरकर करीत आहे.
