लाखांदूर तालुक्यातील प्रकार : भारनियमनामुळे सिंचन करताना अडचणी
भंडारा : ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिकचे तापमान, त्यात भारनियमन असल्याने शेतातील पिकांना सिंचनाची व्यवस्था करण्यात निर्माण होणारी अडचण. यामुळे उभे धान पीक करपू लागल्याने उद्विग्ध शेतकऱ्याने सरकार आणि वीज वितरण कंपनीचा निषेध करण्यासाठी चक्क तीन एकर शेतातील उभ्या धानावर ट्रॅक्टर चालवून धान जमीनदोस्त केले.
लाखांदूर तालुक्यातील पाऊनगाव येथे हा प्रकार घडला आहे. शेतकरी छत्रपती कोरे या शेतऱ्याने त्यांच्या शेतातील धान पिकात ट्रॅक्टर चालवून ते जमीनदोस्त केले. छत्रपती कोरे यांनी तीन एकरात उन्हाळी धानपिक लावले. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आर्थिक तजवीज करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी बाळगली होती. त्यादृष्टीने त्यांनी धान शेतीवर खर्च केला. शेतात धान बऱ्यापैकी मोठे झाले आणि डौलू लागले. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अगदी सकाळपासुनच उन्हाचे चटके जाणवू लागतात. मानवासह वन्यप्रणीही पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहेत. अशात धानपिकाला पाण्याची नितांत गरज आहे.

अनेक ठिकाणी लावण्यात असलेल्या उन्हाळी धानपिक गर्भावस्थेत आहेत. तर, काही गर्भावस्थेत यायचे आहे. अशा धानाला पाण्याची गरज असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. ते शेतकरी सिंचन करून पीक वाचविण्याची धडपड करीत आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्यात वीज कंपनीचा तुघलकी कारभार सुरू असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अतिरिक्त भारनियमन सुरू असल्याने शेतकऱ्यांवर समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. रखरखत्या उन्हाळ्यामुळे शेतातील धानाला मुबलक पाण्याची गरज आहे.
वीज कंपनीचे भारनियमन सुरू असून केवळ दोन तास वीज सुरू राहते. त्यामुळे या दोन तासात शेतीला सिंचित करता येत नाही. धानाला पाणी देण्यात अडचण निर्माण होऊ लागली आहे. पुरेशा पाण्याऐवजी शेतबांध्यात भेगा पडलेल्या आहेत. तर, धान करण्याच्या स्थितीत आहेत. पिकांना पाणी देऊ शकत नाही आणि ते जगवू शकत नाही, अशा द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या लाखांदूर तालुक्यातील पाऊनगाव येथील शेतकरी छत्रपती कोरे यांनी त्यांच्या शेतातील तीन एकरातील शेतातील धानावर ट्रॅक्टर चालवून वीज वितरण कंपनी आणि राज्य सरकारचा निषेध केला.
