दोन गुप्त्या, कटर आणि लोखंडी रॉड साहित्य घटनास्थळी आढळले
भंडारा : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना कारधा पोलिस स्टेशन हद्दीतील आमगाव (दिघोरी) येथे रविवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या थरारक हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळी दोन गुप्त्या, एक कटर, लोखंडी रॉड टाकून पळ काढला. यात एका आरोपीने कारधा पोलिसांसमोर एका हत्यारासह आत्मसमर्पण केले.
सम्मेश मनोज मेश्राम (३६) रा. आमगाव (टोली) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तर, सचिन उके (२९) रा. आमगाव (टोली) असे आत्मसमर्पण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कारधा ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मिसाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार हे आपल्या पोलिस पथकांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एकापेक्षा अधिक आरोपी असलेल्या या हत्येत मृतकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.
आमगाव येथील कवलेवाडा मार्गावर सायंकाळी मृतक सम्मेश हा त्याच्या दुचाकीने गेला होता. तो एकटाच असल्याची संधीसाधून त्याच्यावर गुप्ती, कटर आणि लोखंडी रॉडने अचानक जबर हल्ला केला. यात गंभीर जखमी होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी सर्व हत्यार घटनास्थळी टाकून तिथून पळ काढला. याप्रकरणी कारधा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून एकाने आत्मसमर्पण केले असले तरी या प्रकरणात आणखी चार ते पाच आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि उपअधीक्षक (गृह) विजय डोळस यांनी घटनास्थळी भेट दिली.
