आरोपींची संख्या पोहचली आता आठवर : २२ एप्रिलपर्यंत सुनावली पोलिस कोठडी
भंडारा : आमगाव येथे सम्मेश मेश्राम याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी फरार सात आरोपींना कारधा पोलिसांनी अटक केली असून यात आरोपींची संख्या आता आठवर पोहचली आहे.
आशिष मनोहर उके (३८), सोनु मनोहर उके (२८), दिनेश मनोहर उके (३४), गौरव उर्फ रोहन नरेंद्र उके (२३), मयुर पद्माकर नंदागवळी (२८), विदेश चंद्रशेखर मेश्राम (२९), देवेंद्र भिमराव मेश्राम (२६) सर्व रा. आमगाव (दिघोरी) यांचा समावेश आहे. आमगाव (दिघोरी) येथे रविवारला सायंकाळी सम्मेश मेश्राम याची गुप्ती, कटर, लोखंडी रॉडने हल्ला करून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. तर, सचिन उके याने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.
हत्येनंतर सर्व आरोपी राज्याबाहेर पळून गेले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक (गृह) विजय डोळस यांच्या मार्गदर्शनात आणि पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार,pc अमोल वाघ,pc सचिन बुधे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मिसाळे,pc क्रांतीश कराडे यांच्या पथकाने सर्व आरोपींना अगदी ४८ तासात मंगळवारी अटक केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहा आरोपींना रायपूर येथून तर, देवेंद्र मेश्रामला साकोली तालुक्यातील एकोडी येथून अटक केली.
सर्व आरोपींना आज भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मिसाळे करीत आहे.
