नागपूर : नवजात बाळ विक्री प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून अवघ्या महिनाभर वयाच्या मुलीची विक्री केल्यानंतर त्यातून आलेल्या पैशातून पित्याने नवीन दुचाकी, कुलर, मोबाईल, दिवान आणि ढीगभर नवीन कपडय़ांसह अन्य चैनीच्या वस्तूंची खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमेश्वरी ऊर्फ ईश्वरी (२५) हिचे लग्न वडसा येथे झाले होते.
पहिल्या पतीकडून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. पहिल्या पतीने तिला सोडल्यानंतर तिने उत्कर्ष दहिवले (पवनी-भंडारा) याच्याशी दुसरे लग्न केले. मोलमजुरी करणारा उत्कर्ष हा पत्नी, पाच वर्षांच्या मुलीसह राणी दुर्गावती चौकात राहत होता. दरम्यान, ईश्वरीला महिन्याभरापूर्वीच बाळ झाले. मात्र, दुसऱ्यांदा मुलगी झाल्यामुळे दारूडा उत्कर्ष निराश झाला.
त्याला अनाथाश्रमातील कर्मचारी उषा सहारे हिने गाठले. त्याला नवजात बाळाला विक्री करण्याचे आमिष दाखवले. उषा हिने एका लाखात बाळ खरेदी केले. त्याला लगेच एक लाख रुपये दिले आणि काही पैसे महिन्याभरात देण्याचे ठरले. उषाने शासकीय नोकरीत असलेल्या पेंदाम दाम्पत्याला ५ लाखांत बाळ विकले. दुसरीकडे उत्कर्षने आपल्या पोटच्या गोळय़ाला विकून आलेल्या पैशातून दुसऱ्याच दिवशी नवीन दुचाकी विकत घेतली.
त्यानंतर घरात होम थेटर, नवीन कुलर, दिवान, महागडा मोबाईल फोन खरेदी केला. त्याचा मद्यपानावरील खर्चही वाढला. दुसरीकडे त्याची पत्नी बाळासाठी व्याकूळ होत होती. उत्कर्षने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पत्नी पोलिसांकडे जाऊ शकत नव्हती. शेवटी तिची माया जागृत झाली आणि तिने थेट पाचपावली पोलीस ठाण्यात बाळ विकल्याची तक्रार केली.
उत्कर्षची हपापलेली मानसिकता
पहिले नवजात बाळ विकून बक्कळ पैसा आल्यामुळे उत्कर्ष हपापला होता. त्याला बाळ विक्रीतून पैसे दिसायला लागले. त्यामुळे त्याने भविष्यात होणारे दुसरेही बाळ विक्री करण्याची त्याची मानसिकता होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
स्टॅम्पपेपरवर बाळ विक्रीचा व्यवहार
उत्कर्ष दहिवाले याने पेंदाम दाम्पत्याला बाळ विकले. त्यांच्यात जो व्यवहार झाला त्याचा तपशील स्टॅम्पपेपरवर लिहिण्यात आला व त्याला कायदेशीर रूप प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.
बाळविक्रेत्या दलालाची कारागृहात रवानगी
नवजात बाळाची विक्री करणारी दलाल उषा सहारेला बुधवारी पाचपावली पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तिच्याकडून दलालीचे पैसे जप्त करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने उषाची कारागृहात रवानगी केली तर मुख्य आरोपी उत्कर्ष हा अद्याप पोलीस कोठडीत आहे.
महत्वाच्या बातम्या
Bhandara crime:आमगाव येथील हत्येप्रकरणी आणखी सात जणांना अटक
Nagpur : खाजगी चारचाकी वाहनाला अपघात
