Crime 24 Tass

धक्कादायक…! गोंदिया जिल्ह्यात आढळली अतितीव्र कुपोषित ३०० बालके

गोंदिया : कुपोषणमुक्तीसाठी शासन आणि प्रशासन स्तरावर मागील काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी लाखोचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, यानंतरही कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३०० कुपोषित बालकांची नोंद झाली असून, १८१ बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद, महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी व मिनी अंगणवाडीतील ६ वर्षे वयोगटातील १ लाख २३३ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील ९० हजार ३५० बालकांपैकी ८६,३२१ मुले सर्वसाधारण आढळली, तर दोन हजार बालके मध्यम कुपोषित आढळली. ३०० बालके तीव्र कुपोषित, तर २,३०० बालके कुपोषित आढळले.

या सर्वेक्षणांतर्गत ८६,६२२ बालकांचे प्रत्यक्षात वजन व उंची मोजण्यात आली. अतितीव्र कुपोषित १८१ बालकांना १ एप्रिलला ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात आले. या बालकांना ८४ दिवस या केंद्रात ठेवण्यात येणार असून, त्यांच्या आहार- विहाराचे संपूर्ण निरीक्षण केले जाणार आहे, तर ४८ बालकांना न्यूट्रेशियन रिहॅब केंद्रात दाखल करण्यात आले.

सर्वाधिक कुपोषित बालके गोंदिया तालुक्यात

जिल्ह्यात सर्वाधिक कुपोषित बालके गोंदिया तालुक्यात आहेत. ८१ बालके ही अतितीव्र कुपोषित आहेत, तर देवरी तालुक्यात ५१,

अर्जुनी मोरगाव ३६, तिरोडा ३२, सडक अर्जुनी २८, सालेकसा २४, आमगाव २३, गोरेगाव तालुक्यातील बालकांचा समावेश आहे. ग्राम बाल विकास केंद्रात गोंदिया तालुक्यातील २३, आमगाव ७, सडक अर्जुनी ७, अर्जुनी मोरगाव ६ बालकांचा समावेश आहे.

अतितीव्र श्रेणी कुपोषित बालकांसाठी अंगणवाडी स्तरावरच ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात कुपोषित बालकांना पोषक आहार दिला जात असून, त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेवले जात आहे. जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

संजय गणवीर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]