Crime 24 Tass

राणा दाम्पत्याची कानउघडणी करत मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली !

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर चालिसा अट्टाहास अंगलट आलेल्या राणा दाम्पत्याची मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलीच कानउघडणी केली आहे.

गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावत तगडा हादरा दिला आहे. विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यात तथ्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

मुंबई पोलीसांनी राणा दाम्पत्यावर 124 अ आणि 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची चांगलीच हजेरी घेत फटकारले.

याचिकाकर्ते कायद्याचा सन्मान करणारे लोकप्रतिनिधी आहेत, तर त्यांनी पोलीसांना विरोध करण्याचे कारण नव्हते, अशा शब्दात राणा दाम्पत्याला न्यायालयाने फटकारले.

दरम्यान, राणा दाम्पत्यावर 124 अ (राजद्रोह) कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर तत्काळ सुनावणीस नकार दिल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. राणा दाम्पत्याच्या जामिनावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. रवी राणा यांना तळोजा कारागृहात आणि नवनीत राणा यांची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे.

दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याचा राणा दाम्पत्यावर आरोप

धार्मिक कारण पुढे करून दोन गटांमध्ये वैमनस्य वाढवणे व एकोप्याला बाधा निर्माण केल्याप्रकरणी उपेंद्र लोकेगावकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध 153 अ, 124 अ, 34 भादंवि सहकलम 37 (1), 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यांत त्यांना त्यांच्या खार येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या दोघांनाही रात्री उशिरा सांताक्रूझ लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. दुपारी 12 वाजता त्यांना वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात नेण्यात आले. साडेबारा वाजता न्यायालयात दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. दीड वाजता युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आला आहे. खार पोलिसांनी दोघांना शनिवारी अटक केली होती. रविवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या घरी जायचे असेल तर परवानगी आवश्यक असते. ती घेतलेली नव्हती. शिवाय मुख्यमंत्र्यांसाठी या दाम्पत्याने अपशब्द वापरले.

नोटिशीला न जुमानता शासनाला आव्हान दिले. यातून त्यांचा अप्रामाणिक हेतू उघड झाला. म्हणूनच 124 अ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असेही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.

राणा यांच्या पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी मांडलेले मुद्दे

महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरविण्याबाबत काही राजकीय पक्षांमध्ये आंदोलन सुरू आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर हनुमान चालिसा पठाणाचा कार्यक्रम आयोजित करून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कलम 149 सीआरपीसी अन्वये नोटीस बजावून राणा दामत्यांनी विविध वृत्तवाहिन्यांसह वर्तमानपत्रात हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याची घोषणा करून भडकावू मुलाखत दिली होती, याबाबत तपास बाकी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे दौर्‍यावर येणार आहे. हे माहीत असतानाही त्यांनी कलानगर ते पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्याचा मोठा कट केला होता. त्यामागील तपास करणे बाकी आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने राणा दामत्यांनी जाणीवपूर्वक धार्मिक, राजकीय वाद निर्माण करून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्यामागे त्यांचा काय हेतू होता, याचा तपास करायचा आहे. गुन्ह्यातील त्यांच्या सहकार्‍यांचा शोध घेणे बाकी आहे.

राणा दाम्पत्याला चिथावणी देण्यासाठी कोणी प्रवृत्त केले आहे का, याचा तपास बाकी आहे. असे काही मुद्दे उपस्थित करून सरकारी वकील प्रदीप घरत यांनी त्यांच्या सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. या मागणीला राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी विरोध केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

त्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. आता ही सुनावणी शुक्रवार 29 एप्रिलला होणार आहे. त्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर फैसला होणार आहे.

राणा दाम्पत्यावर अन्य एका गुन्ह्याची नोंद

1 नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी अन्य एका गुन्ह्यांची नोंद केली आहे. राणांच्या खार येथील निवासस्थानी शनिवारी कारवाईसाठी गेलेल्या खार पोलिसांशी राणा दाम्पत्याने अरेरावीची भाषा करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न
केला होता.

2 त्यानंतर या दोघांनी खार पोलीस ठाण्यातही पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अन्य एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात लवकरच त्यांचा खार पोलिसांकडून ताबा घेतला जाणार
आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]