रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं.स.) : गवाणे (ता. लांजा) येथील शाळेतील मुख्याध्यापकाने सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्याने मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मुख्याध्यापकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. मात्र मुख्याध्यापक आपल्याला नापास करतील, या भीतीपोटी मुलीने घरी कल्पना दिली नव्हती. ती मानसिक दडपणाखाली वावरत होती. lr घरात अचानक चक्कर येऊन पडायची. तिच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीने पालकांनी तिची चौकशी केली तेव्हा सारा प्रकार समोर आला. मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समजल्यावर पालकांच्या पायाखालची वाळू सरकली. लगेचच ही माहिती पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर गावच्या मंदिरात गावातील मान-मानकरी, गावकरी यांची बैठक घेण्यात आली. सर्वांनी मुख्याध्यापकाच्या या घटनेचा निषेध केला.
यानंतर रात्रीच सारे ग्रामस्थ लांजा पोलीस ठाण्यात पोहोचले. सारा प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी लगेच मुख्याध्यापकावर बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
