प्रतिनिधी/भंडारा
भंडारा जिल्ह्यात रेती माफीयांना पोलीस प्रशासनातर्फे संरक्षण दिले जात असल्यामुळे भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारीला उधान आले आहे. एसडीओ राठोड यांच्यावरील हल्ल्याला पोलीस प्रशासनच जबाबदार असून जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव व पवणीचे ठाणेदार गायकवाड यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा पवनी तालुका शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. तहसीलदार पवनी मार्फत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना देण्यात आले आहे.
दि. 26 एप्रिलच्या रात्री 3.30 वा. उपविभागीय अधिकारी श्री. रविंद्र राठोड अवैध रेती तस्करी विरूध्द कार्यवाही करीत असतांना 50 ते 60 रेती माफीयांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. महिन्याभरापूर्वी मोहाडीच्या तहसिलदारावर अशाच पध्दतीचा हल्ला झाला होता.
अशा पध्दतीच्या अनेक घटना जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. पोलीस प्रशासनाचा पर्यायाने कुठलाही कायद्याचा धाक रेती माफीयांवर राहीला नाही. पोलीस अधिक्षकांच्या निर्देशानुसार पोलीस प्रशासनातील एक कर्मचारी स्वतःला दुसरा एसपी असल्याचे भासवून या रेती माफीयांकडून हप्ते वसुल करीत असल्यामुळे रेती माफीया पोलीसांना जुमानत नाही. जिल्ह्यात जुगार,सट्टा, कोबडेबाजार,व्यश्याव्यवसाय,अवैध प्रवासी वाहतूक असे सर्व अवैध व्यवसाय जोमात सुरू असून यामुळे गुन्हेगारी पण वाढली आहे,सदर घटनेमुळे जिल्ह्यातील महसूलच्या बड्या अधिकाऱ्यावर हल्ला झाल्यामुळे असुरक्षीततेची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक व ठाणेदार कायदा व्यवस्था हाताळण्यास कमकुवत ठरत आहेत. तरी कृपया अशा भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिक्षक आणि ठाणेदारांना तात्काळ निलंबित करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना पवनी तालुका प्रमुख प्रशांत भूते,विधानसभा प्रमुख बाळू फुलबांधे,आशिष माटे, शहर प्रमुख देवराज बवनकार, नामदेव सुरकर,प.स.सदस्य बादल ठवरे,उमेश पंचभाई,सुल्तान अली,दिलीप हटवार आदी उपस्तिथ होते.
